कौशल्य विकास केंद्रातील १८० विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्या, कौशल्य विकास राज्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक
( श्रीराम कांदु )
ठाणे दि १७: कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री डॉ रणजीत पाटील यांनी आज गावदेवी मंडई येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या कौशल्य विकास केंद्रास भेट देऊन प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी हे केंद्र सुरु करण्यामागची भूमिका सांगितली.
हे केंद्र सुरु होऊन वर्ष पूर्ण होत असून या केंद्रातील १८० जणांच्या पहिल्या तुकडीला विविध ठिकाणी नोकऱ्या लागल्या आहेत ही अतिशय चांगली बाब असून या केंद्रासारख्या उपक्रमास अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाईल असेही ते म्हणाले.
प्रशिक्षणार्थीशी बोलतांना राज्यमंत्री पाटील यांनी त्यांना या कौशल्यप्राप्तीनंतर भविष्यात त्यांचे काय नियोजन आहे तेही विचारले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्राधान्य क्रमांमध्ये कौशल्य विकासाला देखील महत्व दिले आहे असे सांगून ते म्हणाले कि, देशाची महासत्ता होण्याची ताकद आपल्या युवा पिढीत आहे. त्यामुळे हि पिढी विविध कौशल्यात पारंगत होणे गरजेचे आहे.
डॉ रणजीत पाटील यांनी यानंतर कोपरी येथील मुलींच्या आयटीआय आणि वागळे येथील आयटीआयला भेट देऊन मुलांशी चर्चा केली तसेच त्यांना मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार श्री पैठणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी आमदार संजय केळकर, प्रवीण दरेकर, मनपा उपायुक्त सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार आदींची उपस्थिती होती.