कोल्हापूर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना शासनाची पाच लाखांची मदत ,चंद्रकांत पाटील यांची घोषणा

(एम विजय )

कोल्हापूर – कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलावरुन शुक्रवार (दि.२६) रात्री पावणेबारा वाजता टँपो ट्रॅव्हलर मिनी बस क्रं. एमएच-१२ एनएक्स ८५५० वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. या अपघातात पुण्याचे रहिवासी असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयाची मदत देण्यात येईल, अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अपघातातील जखमींची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, सि.पी.आर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अधिष्ठाता डॉ. रामानंद, तहसिदार उत्तम दिघे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

जखमींची भेट घेऊन या अपघाताबद्दल माहिती देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वाहनातील प्रवासी हे पुणे जिल्ह्यातील बालेवाडी व पिरंगुट येथील रहिवाशी आहेत. सदर अपघातातील मृतांमध्ये ६ पुरुष व ७ स्त्रिया असून, त्यामध्ये १६ वर्षाखालील ७ जणांचा समावेश आहे. यात ३ स्त्रिया गंभिर जखमी आहेत. हे पर्यटक रत्नागरी जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळाना भेट देऊन पुण्याकडे जात असताना मिनी बस रात्री शिवाजी पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्यावर जोराने आदळली व कठडा तोडून गाडी खाली कोसळली.

आजरा तालुक्याच्या दौऱ्यावरुन कोल्हापूरच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावरुन येत असताना सदरची माहिती मिळाल्याने तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहीते व आपत्ती व्यस्थापनाची टीमही घटनास्थळी पोहोचली. या भागातील नागरीकही तात्काळ मदतीसाठी घटना स्थळी धावले. मदत कार्य तात्काळ सुरु केल्याने जखमींना वेळेत उपचार मिळाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने मिनी बस पाण्याबाहेर काढण्यात आली.

या अपघातात बस मधील एकूण १६ जणांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ सि.पी.आर मध्ये दाखल करण्यात आले होते. मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयाची मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल, असे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध विमा योजनांचाही लाभ मिळवून देण्यात येईल, असेही सांगितले. सि.पी.आर. मध्ये उपचार घेत असलेल्या जखमींना आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णांलयातही उपचाराची तयारी प्रशासनातर्फे ठेवण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी पुणे येथे उपचारासाठी हलविण्याची विनंती केल्यानुसार त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. तसेच पुणे येथेही आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाजी पुलाबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या ५ ते ६ वर्षांपासून शिवाजी पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबीत असून, नविन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. तथापी या ठिकाणी जुनी लेणी असल्याने पुरातत्वखात्याच्या नियमानुसार २०० मिटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या नविन पुलाचे काम रखडले. या कायद्यात बदल करुन हे अंतर २०० मिटर वरुन ५० मिटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email