कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्म बांधण्याची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची आग्रही मागणी

 

कोपर आणि कल्याण स्थानकांची केली पाहाणी

कल्याण पूर्वेच्या प्रवाशांना मिळणार स्थानकापर्यंत थेट रस्ता

कोपर स्थानकात मुंबई दिशेला होणार एफओबीजुन्या एफओबीचे रुंदीकरण करण्याच्या सूचना

( श्रीराम कांदु )

ठाणे : भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन अंबरनाथ आणि ठाकुर्लीप्रमाणेच कोपर स्थानकात देखील पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म बांधण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी केली. वाढती गर्दी आणि रेल्वे रूळ ओलांडून होणारे अपघात यांची गंभीर दखल घेऊन गुरुवारी खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत कोपर आणि कल्याण स्थानकांचा दौरा केला.

कोपर रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडे एकच पादचारी पुल (एफओबी) असून मुंबई दिशेकडे तातडीने नवा एफओबी बांधण्याची मागणी नुकतीच खा. डॉ. शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकीत केली होती. ही मागणी मान्य झाली असून या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. तसेच, जुन्या एफओबीचे रुंदीकरणही लवकरच हाती घ्यावे, असेही डॉ. शिंदे म्हणाले. मुंबई दिशेकडील नव्या एफओबीवर बुकिंग ऑफिसची सुविधा देण्याची सूचनाही त्यांनी केली.

कोपर स्थानकातील दिवा-वसई मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ची दुरवस्था पाहून खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या फलाटांवर शेड आणि शौचालयाची व्यवस्था पुरवण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. ही कामे लवकरात लवकर हाती घेण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कल्याण पूर्वेच्या प्रवाशांना थेट रेल्वे स्थानकापर्यंत जाता यावे, यासाठी उपाययोजना करण्यासंबंधी खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहाणी केली. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांसाठी स्कायवॉक उपलब्ध झाला असला तरी बरेच अंतर पायी चालून स्थानकापर्यंत जावे लागते. त्यामुळे स्कायवॉक लगतच पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या जुन्या कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण केल्यास रिक्षा आणि छोट्या वाहनांना स्थानकापर्यंत जाता येईल आणि प्रवाशांची पायपीट थांबेल, अशी सूचना करून खा. डॉ. शिंदे यांनी त्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. हा मार्ग झाल्यास किमान दीड लाख प्रवाशांना त्याचा फायदा होणार असून विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि लहान मुलांची गैरसोय टळणार आहे.

या ठिकाणी रेल्वे हद्दीत असलेला नाला कच्च्या स्थितीत असून त्याची सफाई देखील नीट होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तातडीने या नाल्याची सफाई करून हा नाला पक्का करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. तसेच, स्काय वॉक खाली शौचालय उभारण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

गुड्स शेड कायम राहाणार – अडिच हजार कामगारांना दिलासा

खा. डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी कल्याण येथील गुड्स शेडची देखील पाहाणी केली. सुमारे अडिच हजार कर्मचारी येथे कार्यरत असून कल्याण यार्ड रिमॉडेलिंगमुळे गुड्स शेड बंद पडणार, अशी त्यांच्यात भीती आहे. खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांची चर्चा घडवून आणली. रिमॉडेलिंगनंतरही हे यार्ड इथेच राहाणार असल्याची ग्वाही, याप्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

येथील सुमारे अडिच हजार कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, येत्या १५ दिवसांत पाण्याची टाकी आणि पाणी शुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

दर्शन हॉल ते गुड्स शेड या मुख्य वहिवाटीच्या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वेला इथून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आणि तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळस्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, कल्याण विधानसभा सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, सभागृहनेते राजेश मोरे,नगरसेवक दीपेश म्हात्रे, कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी, परिवहन सभापती संजय पावशे, मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ अभियंते श्री. तरुण, विभागीय वरिष्ठ विद्युत अभियंते श्री. परमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रकाश कनोजियास्टेशन प्रबंधक पी. के. दासकेडीएमसीचे उपअभियंते नेमाडे आदी अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email