कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात.
म विजय
सांगली – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली ताकद वाढविण्याचे काम सुरू केले असून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गळ टाकला आहे. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या मिरजेतील एका नगरसेवकाने कॉंग्रेसचे सहा तर राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक भाजपच्या एका नेत्याच्या दरबारी नेले होते, त्यांच्याशी प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर हादरा बसण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुका जुलैमध्ये होणार आहेत. निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाने सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. दि. १७ पर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. भाजप देखील मनपावर झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागली आहे. यापुर्वी भाजपने जिल्ह्यात मोठी मुसंडी मारली. लोकसभा, विधानसभा उमेदवारीतून भाजपला फायदा झाला आहे. हाच फॉर्म्युला त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती ते नगरपालिका, ग्रामपंचायतींमध्येही अवलंबला. त्याद्वारे जिल्ह्यात भाजप पक्ष नंबर वन बनला आहे. यासाठी स्थानिक आघाड्यांचाही आधार घेतला. त्यातून मार्केट कमिटी, जिल्हा बँकेतही बस्तान बसविले आहे.
कॉंग्रेसच्या ताब्यात एकमेव मोठी संस्था अशी महापालिका आहे. ही सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने निवडणुकीच्या तोंडावर आमदार सुधीर गाडगीळ यांनी ३२ कोटींची कामे मनपा क्षेत्रात मंजूर केली आहेत. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली असून काही कामांना सुरूवात झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी-कॉंग्रेसने भाजपला थोपविण्यासाठी निवडणुकीसाठी आघाडीचा झेंडा फडकवण्यास सुरुवात केली आहे. निर्णय अद्याप झाला नसला तरी तसे नेत्यांकडून स्पष्ट संकेत देण्यात आहेत. भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर आपला गळ टाकण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष मोठा आहे.