केंद्र शासनानं गॅस गळतीवर त्वरीत उपाययोजना
( श्रीराम कांदु )
केंद्र शासनानं गॅस गळतीवर त्वरीत उपाययोजना करण्यासाठी देशपातळीवर १९०६ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून होणा-या गॅस गळतीमुळं आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ही गॅस गळती घरातली असेल अथवा शेजारच्या घरातली. अशावेळी तातडीनं संपर्क साधण्यासाठी केंद्र शासनानं ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. देशाच्या कोणत्याही भागातून कोणत्याही वेळी या सेवेवर संपर्क साधता येणार असून ९ भाषांमधून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मदत देण्याचं काम वेब बेस्ड ॲप्लीकेशनद्वारे केलं जातं. या क्रमांकावर येणारे दूरध्वनी, कॉलसेंटरमधील कर्मचारी, लोकेशन पाहून जवळच्या गॅस वितरकाच्या अथवा मेकॅनिकला शोधून त्याला गॅस गळतीचा हा संदेश थेट पोहचवतात. काही कारणामुळे वितरक अथवा मेकॅनिकनं दूरध्वनी न उचलल्यास हा संदेश थेट पेट्रोलियम कंपनीच्या अधिका-यांपर्यंत अथवा वरिष्ठ अधिका-यांपर्यंत जाण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा सक्रीय होऊन संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली जाते आणि गॅस गळतीवर उपाययोजना होते.