कृषी क्षेत्राला सर्वाधिक पसंतीचा दर्जा देऊन संसाधन वाटपाला प्राधान्य हवे : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.२६ – कृषी क्षेत्र देशातल्या निम्याहून जास्त लोकसंख्येला रोजगार पुरवत असून धोरणकर्त्याने या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. संसाधन वितरण करताना कृषी आणि ग्रामीण विभागाप्रती सकारात्मक कल राखावा असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय अन्न आणि कृषी परिषदेतर्फे देण्यात येणारे पहिले जागतिक कृषी पारितोषिक प्रोफेसर एम. एस. स्वामीनाथन् यांना प्रदान केल्यानंतर ते आज नवी दिल्लीत बोलत होते.
प्रख्यात कृषी वैज्ञानिक प्रोफेसर एम. एस. स्वामीनाथन हे कृषी क्षेत्रातील विश्वगुरु आहेत अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला. प्रोफेसर स्वामीनाथन यांनी भारताच्या अन्न सुरक्षिततेचा भक्कम पाया घातला असे उपराष्ट्रपती म्हणाले.
कृषी क्षेत्राला सर्वाधिक पसंतीचा दर्जा देण्याची आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून पायाभूत सुविधा, सिंचन, गुंतवणूक, विमा आणि पतपुरवठा याची गरज असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. कृषी क्षेत्र अधिक व्यवहार्य आणि आकर्षक कसे करता येईल हे पाहणे आवश्यक असून, कृषी क्षेत्र शाश्वत करण्यासाठी वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि शेतकरी यांच्यात नियमित आणि प्रभावी समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली.
कृषी क्षेत्र स्वीकारणाऱ्यांच्या घटत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषी क्षेत्राच्या विकासावर परिणाम करणाऱ्या बाबींची दखल घेण्यासाठी एकत्रित आणि संबंधित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.