कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचे प्रमोशन

( म विजय )

मुंबई, दि. २४ कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकारच्या पुढाकाराने मराठी चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचले. एका बाजूला मराठी चित्रपट सातासमुद्रा पलिकडे जात असतानाच आता मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने चीन मध्येही मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयामार्फत ही प्रक्रीया सुरु करण्यात येणार असून लवकरच मराठी चित्रपट चीनमध्येही पहायला मिळणार आहेत.

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यात ‘रिंगण’, ‘हलाल’, ‘वक्रतुंड महाकाय’ या तीन चित्रपटांचा समावेश आहे. यातील एखाद्या चित्रपटाच्या सहभागाबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून ‘द सायलेन्स’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत या उद्देशाने पणजी येथे झालेल्या ४६ व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नऊ चित्रपट पाठविण्यात आले होते. येत्या ११ ते २१ मे या कालावधीत कान्स चित्रपट महोत्सव होत आहे.

मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोदतावडे यांनी सातत्याने विविध नवीन उपक्रम सुरु केले. याच उपक्रमांतर्गत गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट व कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये मराठी चित्रपटांचे प्रमोशन आणि ब्रँडींग व्हावे या दृष्टीने निवडक मराठी चित्रपट व त्यांचे दोन प्रतिनिधी महोत्सवात पाठविण्यात आले. या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक यांच्याशी संवाद साधून देण्याचे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली करुन देण्याचे काम शासनाने केले आहे.

यातील पुढचे पाऊल म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांच्या प्रयत्नातून इतर देशात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. चीन सारख्या मोठ्या देशात मराठी चित्रपट प्रदर्शीत करण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आज एक बैठक पार पडली. केंद्र सरकारच्या वाणिज्य व उ्द्योग मंत्रालय मार्फत हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या दृष्टीने आज झालेल्या बैठकीत प्रथमत: काही मराठी चित्रपट Subtitles सह/dubbing सह तेथील आयोजक व वितरक यांना दाखविण्यात येणार आहेत व त्यांच्या माध्यमातून ते चीनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याचा प्रत्यक्ष फायदा मराठी चित्रपट निर्माते वितरक यांना होईल. तसेच या उपक्रमास प्रतिसाद मिळण्यास या माध्यमातून यापुढे अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नियोजन करण्यात येईल. या उपक्रमाचे मराठी चित्रपट जगतात स्वागत करण्यात येत आहे.  महासंचालक श्रीमती संगीता गोडबोले व उपसंचालक श्रीमती ज्योती कौर यांची व मराठी चित्रपट निर्माते, वितरक यांची पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शासनाचे उपसचिव संजय भोकरे, चित्रनगरी संचालक व सल्लागार मिलिंद लेले, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक, संजीव पलांडे तसेच चित्रपट क्षेत्रातील मेघराज भोसले, श्रीमती निलकांती पाटेकर, महेश मांजरेकर, अभिजीत पानसे, नितीन वैद्य, नानुभाई जय सिंघानी, निनाद वैद्य इ. उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email