*कल्याण शहराचा काही वर्षातच कायापालट होणार कोरियन शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आयुक्तांचा विश्वास*
( तेजस राजे )
कल्याण शहराच्यादृष्टिने प्रस्तावित टाऊनशीप हा महत्वाचा टप्पा असून, काही वर्षातच कल्याण शहराचा कायापालट होणार आहे. तसेच स्मार्टसिटीअंतर्गत राबवावयाच्या योजना जलदगतीने पूर्ण करण्याचा आमचा मानस असून शासनाच्या मान्यतेने निश्चित होणाऱ्या योजनांची कामेही शीघ्रतेने करण्यास आमचे प्राधान्य राहील असा विश्वास महापालिका आयुक्त पी. वेलारासु यांनी कोरियन शिष्टमंडळाच्या भेटीनंतर व्यक्त केला.
कल्याण शहराच्या सुनियोजित विकासासाठी शुक्रवारी दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने महापालिकेस भेट दिली. या शिष्टमंडळात एलएच कोरिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष पार्क सँग वू , कंपनीचे डायरेक्टर जनरल ली जीऑेग वुक, ली की योल, कँग कु हॅवॅग व अन्य पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त पी. वेलारासू, महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजप गटनेते वरूण पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती वैशाली पाटील, एमआयएम गटनेत्या तनझिला मौलवी, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, सहा. संचालक नगररचना प्रकाश रविराव, कार्यकारी अभियंता प्रकल्प तरूण जुनेजा व महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.
स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करावयाच्या कल्याण येथील सापाड, वाडेघर येथील २५० हेक्टर जमिनीवर नवीन टाउनशिप विकसित करण्याची महापालिकेची योजना आहे. हे टाउनशिप अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी साउथ कोरिया येथील लॅन्ड अॅन्ड हाउसिंग कॉरर्पोरेशन या शासकीय कंपनीने सहभाग घेण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, गत एक वर्षापासून या प्रकल्पावर कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत अभ्यास चालू आहे. या भेटीदरम्यान कल्याण नदी किनारालगतच्या जमिनीवर टाउनशिप विकसित करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींनी नियोजित जागेची पाहणी केली.
एलएच कोरिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्क सँग वू यांनी याप्रसंगी सांगितले की, कल्याण हे शहर मुंबईलगत असून भौगोलिकदृष्ट्या या शहराला मोठा नदी किनारा लाभला आहे. नव्याने विकास होण्याकरिता योग्य व पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्यातुन कल्याण शहर विकसित होण्याकरिता उत्तम ठिकाण असल्याने आम्ही या शहराची निवड केली आहे.
भारत आणि कोरिया या देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारात एकमेकांचे सहाय घेवून विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे. भारत आणि कोरिया या दोन्ही देशात चांगले संबंध आहेत, त्यामुळे कल्याण व्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये देखील आम्ही स्मार्ट सिटीअंतंर्गत कामे घेणार आहेात.
आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले की, एलएच कोरिया कंपनीशी महापालिकेने यापूर्वी केलेल्या करारानुसार दोन्ही पक्षांकडून प्रस्तावित टाऊनशीप योजनेचा सखोल अभ्यास सुरू असून, महापालिकेतर्फे आवश्यक ती मदत कोरियन कंपनीस करण्यात येत आहे. प्रस्तावित टाउनशिपसाठी कोरियन कंपनीबरोबर यापुढेही महापालिका असे सहकार्य देत राहील. तर येत्या काही दिवसांत टाउनशिप विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून, प्रत्यक्ष कामांना सुरूवात होईल, असे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान चर्चेनंतर प्रत्यक्ष विकसित करावयाच्या क्षेत्राची दोन्ही शिष्टमंडळांनी संयुक्तपणे पहाणी केली. या पहाणीनंतर शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी काळा तलाव येथे असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास भेट देवून त्यांना आदरांजली वाहिली.