कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न ,ग्रामीण जनतेचे जीवन टँँकरवर अवलंबून

वितरण व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे संकट

(श्रीराम कांदु)

डोंबिवली- कल्याण डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली जवळील २७ गावामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करत असून नांदिवली-पंचानंद परिसरातील रोज ४० ते ५० टॅकरने पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे जीवन टॅकरवर अवंलबून  आहे. या भागातील पाणी टंचाईला वितरण व्यवस्था कारणीभूत असल्याचे अधिकारी व नगरसेवकही मान्य करत आहेत.

नांदिवली-पंचानंद भागात प्रभाग ११२ (नांदिवली पंचानंद ) पी अॅन्ड टी कॅालनी (११३) व नांदिवली मिनल पार्क (११५) या तिनही प्रभागातून शिवसेनेच्या महिला नगरसेविका विजयी झाल्या आहेत. हे तीनही प्रभाग शहराला खेटून असल्याने  व या भागाची लोक संख्या झपाट्याने वाढत आहे. मोठ मोठी संकुले झाली आहेत. पण नागरिकांना पाण्यासाठी वणवण कराव लागत आहे. २७ गावासाठी रोज ४५ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे औद्योगिक पाणी पुरवठा मंडळ सांगत आहे. पण मध्येच होणारी पाण्याची गळती,बुस्टर लावून पाणी खेचण्यात येत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. औद्योगिक विकास मंडळ पाणी पुरवठा करते पण वितरणाची जबाबदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची असल्याने व तीच व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

महापालिकाक्षेंत्रात ज्या प्रमाणे पाणी साठवण टाक्या आहेत तशी व्यवस्था नाही तसेच मोठ्या प्रमाणात बुस्टरचा वापर होत असल्याने जे नागरिक त्याचा वापर करत नाहीत त्यांना पाणी मिळत नाही.त्याचप्रमाणे उघडपणे होणारी पाण्याची चोरी , गळती अशीही कारणे पाणी टंचाईला जबाबदार आहेत.नांदिवली पंचानंद मधील एक महिला हिरा सहाणे या ५० वर्षाच्या असून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रोज दुपारी विक्रोळीला आपल्या मुलीकडे जातात व सोबत पाण्याचे बॅरल, बाटल्या भरून घेऊन येतात. अशी माहिती नगरसेविका रुपाली म्हात्रे यांनी दिली.राज्य शासनाने या भागातील पाणी पुरवठा करण्यासाठी १८२ कोटींची अमृत योजना तयार केली असून ही योजना प्रत्यक्ष अमंलात येण्यास दोन वर्षे लागणार आहेत . तो पर्यंत नागरीकांचे जीवन टॅकरवर अवलंबून राहणार आहे हे नक्की.

 

Leave a Reply

Your email address will not be published.