कल्याण डोंबिवली गुन्हे वृत्त
भर रस्त्यावरील पानटपरी फोडून माल लंपास
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील नेतीवली संगम बेकरीच्या मागे गुप्ता चाळीत रहाणारे बालेश्वर गौड यांचे बैलबाजार स्मशान भूमीजवळ लालजी पान-बिडी शॉप आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी निघून गेले. तिघांनी मिळून टपरीचे कुलूप तोडून तेथिल रोकड व सिगारेट्सची पाकिटे लंपास केली. रविवारी सकाळी दुकान उघडण्यास गेलेल्या गौड यांना दुकानात चोरी झाल्याचे कळले. गौड यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सर्फराज हैदरअली कुरेशी, जरीश जावेद, इम्रान अशा तिघा जणांवर संशय व्यक्त करणारी तक्रार दाखल केली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
टवाळखोरांचा हॉटेल चालकावर हल्ला
डोंबिवली : वार्ताहर
हॉटेल बाहेर बसून टवाळक्या करणाऱ्या तरूणांना हटकल्याने या तरूणांनी हॉटेल चालकास बेदम झोडपून काढले. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास कल्याणमध्ये घडला असून पोलिसांनी अद्याप एकाही टवाळखोराला अटक केली नसल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
उल्हासनगर येथे राहणारे आशिष राय यांचे कल्याण पूर्वेकडील मेट्रो मॉल समोर सिलिचिली नावाने चायनीजचे हॉटेल आहे. रात्री साडे आठच्या सुमारस अमजद, फैजान, सागर व त्यांचा एक साथीदार असे चौघेजण राय यांच्या हॉटेल बाहेर बसून टिंगल-टवाळी होते. यावेळी राय यांनी या चौकडीला हटकले व माझ्या धंद्यावर परिणाम होतो, असे सांगत इथे बसु नका असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या चौकडीने राय यांच्याशी वाद घातला. शिवाय बेदम झोडपून त्यांच्या गळ्यातील 55 हजार रूपये किंमतीची चेन खेचून पळ काढला. राय यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस फरार चौकडीचा शोध घेत आहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सहा जुगारी गजाआड
डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील जोशीबाग परिसरातील खटलमा हाऊस समोर मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती. रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या गस्तीदरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक केली. पप्पू सिंग, सिंटू गुप्ता, विश्वनाथ कुशवाह, आरिफ शेख, अन्नू दोहरे, भुरेसिंग राजभट अशी सहा जणांची नावे आहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
कल्याण पूर्वेत घरफोडी
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात पंचवटी कॉलनीमधील चाळीतील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्याने घरातील सोन्याचे मंगळसूत्र व पितळेच्या मूर्त्या, असा मिळून 11 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी घरमालकाने कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
〰〰〰〰〰〰