कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम रातोरात युद्धपातळीवर सुरू
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१४ – कल्याण डोंबिवलीत झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यांना खड्डे पडले असून गेल्या दीड महिन्यात अपघात होऊन ५ जण दगावले असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीच नाही तर ठाणे जिल्ह्यातील खड्डे ४८ तासात भरण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून काल दोन्ही शहरात रातोरात खड्डे भरण्यास सुरवात झाली आहे.
कल्याण डोंबिवलीत सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ,राज्य रस्ते विकास महामंडळ ,सार्वजनिक बांधकाम विभाग केडी एमसी ,एम आय डी सी व राष्ट्रीय महामार्ग अशा विवीध सरकारी यंत्रणा रस्त्याची कामे करत आहेत मध्ये आचार संहिता असल्याने खड्डे भरण्याचे टेंडर निघाले नाही. यामुळे खड्डे भरता आले नाहीत अशी माहिती कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर आयुक्त गोविद बोडके यांनीही अधिकार्याच्या सुट्या रद्द करून दोन दिवसात सर्वे करून खड्ड्यासादर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले.
डोंबिवलीचे उपअभियंता राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली खड्डे भरण्याच्या कामाला रात्री उशिरा सुरवात करण्यात आली असून सर्व खड्डे भरण्यात येतील असे त्यांनी सांगितले
डोंबिवलीतील मुख्य रस्ते सिमेंट कॉक्रीट असले तरी अंतर्गत व ग्रामीण रस्ते खराब झाले असून मोठे खड्डे पडले आहेत.
शहरातील आजदेगाव, गोळवली, पिसवली, मानपाडा, विष्णूनगर, पाथर्ली, महाराष्ट्रनगर, जुनी डोंबिवली, नवापाडा, गरीबाचावाडा, गणेशनगर, आयरेरोड, ठाकूरवाडी आदी रस्त्यांवर खड्डेच-खड्डे झाले आहेत. महापौर विनिता राणे यांनी सांगितले कि, सर्व खड्यांच्या निविदा झाल्या असून पाऊस कमी होताच डांबरीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजविणे कामाला सुरवात होणार आहे. सध्या खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. रस्ते डागडूजीसाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ती कामेही सुरु होणार आहेत. तर याबाबत कार्यकारी अभियंता सुभाष पाटील म्हणाले, खड्डे बुजविण्याची प्रक्रिया जानेवारीपासून होत होती. तीन वेळा निविदा काढूनही कोणी निविदा भरली नाही. यानंतर आचारसंहिता लागली त्यामुळे खूप वेळ वाया गेला आणि ही समस्या निर्माण झाली. सध्या डांबरीकारणाचा प्लँट पावसाळ्यामुळे बंद असल्याने थोडे उन पडल्यावर तो सुरु होईल आणि नंतरच डांबरीकरणातून खड्डे बुजवून रस्त्यांची डागडूजी होईल.