कल्याण-डोंबिवलीतील बैठ्या चाळी-झोपड्यांना वाढला धोका
डोंबिवली दि.१६ – शुक्रवारपासून मुसळधार पावसाने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, परिसराला अक्षरश: झोडपून काढले आहे. कल्याण आणि डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते, तर काही भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरातील नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने रस्ते पाण्यात वाहून गेले. त्यामुळे वाहतुकीचा बोऱ्या वाजला आहे.
मुसळधार पावसाने कल्याण, डोंबिवली शहरातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुरबाड रस्ता, पत्रीपूल-दुर्गाडी रस्ता, संतोषी माता, खडकपाडा भागातील रस्त्यांवर काही ठिकाणी गटाराचे पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने काही भागांत रिक्षावाल्यांनी रिक्षा बंद ठेवल्या होत्या. पालिकेची आपत्कालीन, अग्निशमन यंत्रणा गुरुवार रात्रीपासून शहराच्या विविध भागांत कोसळलेली झाडे तोडणे, तुंबलेले पाणी मोकळे करण्याची कामे करीत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पाऊस सुरू झाला की कल्याणमधील खाडीकिनारी असलेला रेतीबंदर भाग अतिशय संवेदनशील बनतो. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस, समुद्राला दुपारी येणारी महाभरती यामुळे रेतीबंदर बाजारपेठ भागात काही तास पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज असल्याने स्थानिक रहिवाशांनी स्थलांतराची तयारी ठेवली आहे. गेल्या वर्षीही दोन दिवस समुद्राला उधाण असल्याने खाडीचे पाणी कल्याणमधील बाजारपेठ, रेतीबंदर, वालधुनी, भागांत घुसले होते. या भागातील जहाज बांधणी व्यवसाय या काळात बंद ठेवण्यात येतात, असे येथील रहिवाशांनी सांगितले.