कल्याणच्या आदिवासी वसतिगृहातील जेवणात अळ्या,विद्यार्थ्यांची पोलिसांकडे लेखी तक्रार,ठेकेदाराला करणे दाखवा नोटीस…
.
( श्रीराम कांदु )
आदिवासी विद्यार्थ्यांसोबत होणारा दुजाभाव झाला उघड….
कल्याणच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहात जेवणात अळ्या आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली असून वसतिगृह प्रशासनाने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कल्याणच्या बिर्ला कॉलेजजवळ राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागातर्फे चालवलं जाणारं आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. या वसतिगृहात राज्याच्या विविध दुर्गम भागातले 90 आदिवासी विद्यार्थी सध्या राहतायत. त्यांच्या भागात शिक्षणाच्या सोयीसुविधा नसल्यानं कल्याणमध्ये राहून हे विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवणही अत्यंत निकृष्ट दर्जाचं देण्यात येतं. काल या प्रकाराने परिसीमा गाठली, कारण विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पनीरच्या भाजीत चक्क अळ्या आढळून आल्या. याबाबत बिद्यार्थ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना जाब विचारला असता त्यांनी उलट विद्यार्थ्यांनाच दमदाटी केली, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
कालच्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून ठेकेदाराचं जेवण घेणं बंद केलंय. त्यामुळं आज सकाळी तयार करण्यात आलेलं जेवण ठेकेदाराने अक्षरश: कच-याच्या डब्यात फेकून दिलेलं आढळलं. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आम्ही वसतिगृहाच्या किचनची पाहणी केली असता तिथे अस्वच्छ वातावरण आणि किडे लागलेली फळे आढळून आली. त्यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांसोबत शासन आणि त्यांचे ठेकेदार कसे वागतात, याचं वास्तव समोर आलंय. या वसतिगृहात मुलांना जेवण देण्याचं कंत्राट भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला देण्यात आलंय. त्यासाठी एका विद्यार्थ्यामागे ठेकेदाराला महिन्याचे ३२०० रुपये देण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात ठेकेदार नावाला असून भिवंडीच्या एका अनुदानित शाळेचा मुख्याध्यापक हे ठेके चालवत असल्याची माहिती वसतिगृहाच्याच कर्मचा-यांनी ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिलीये. या सगळ्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरोधात लेखी तक्रार केली असून वसतिगृह प्रशासनाने यापूर्वीच ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याचंच कालच्या घटनेवरून स्पष्ट झालंय. त्यामुळं आता आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास मंत्री याकडे लक्ष देतील का? याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय
Please follow and like us: