कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला शेकडो दिव्यांनी उजळला
(म विजय )
कल्याण – येथील दुर्गाडी किल्ला म्हणजे कल्याणची शान, कल्याणची अस्मिताच जणू. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या पहिल्या वहिल्या आरमाराचे सुवर्णाक्षर म्हणून या किल्ल्याची इतिहासात नोंद आहे. छत्रपतींचा हा पराक्रम सतत स्मरणात राहावा आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला आपल्या पराक्रमी इतिहासाची माहिती व्हावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गेल्या ७ दशकांपासून याठिकाणी त्रिपुरी पौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. दिवंगत मनोहर वैद्य यांच्या ‘एक घर एक पणती’ या संकल्पनेतून या उत्सवाची भक्कम अशी पायाभरणी झाली. ज्याचे फलित म्हणजे एवढ्या वर्षानंतर आजही ही परंपरा अव्याहतपणे सुरू असून दर वर्षागणिक ती अधिक व्यापक बनत चालली आहे.
त्रिपुरी पोर्णिमेनिमित्त या किल्ल्याच्या पायथ्यापासून ते पार मंदिराच्या कळसापर्यंत जिथे नजर फिरेल तिकडे शेकडो दिवे आणि त्यांचा लखलखाट दिसत होता. तर किल्ल्यावर ठिकठिकाणी काढण्यात आलेली सप्तरंगी रांगोळी आणि त्याभोवती करण्यात आलेली दिव्यांची आरास अजूनच नजरेत भरत होती. जणू काही किल्ल्याला एक दिवसाकरिता का होईना त्याचे गतवैभव प्राप्त झाले होते. हा सर्व रंगांचा, दिव्यांचा आणि त्यांच्या प्रकाशाचा अविष्कार पाहण्यासाठी कल्याणबरोबरच आसपासच्या परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती