कमांड रुमच्या माध्यमातून लोकांच्या मनात वृक्ष लागवडीसंदर्भात विश्वास जागवा ; सुधीर मुनगंटीवार
मुंबई – वृक्ष लागवड हा वन विभागासाठी एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम नाही, ते एक मिशन आहे हे लक्षात घेऊन वृक्ष लागवडीचे सर्व काम पारदर्शकपणे झाले पाहिजे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कमांड रुमच्या माध्यमातून लोकांच्या मनात वृक्ष लागवडीसंदर्भात विश्वास जागवा, गुगल सर्चद्वारे त्यांना करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्या, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वनमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वन विभागासह इतर सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वन विभागाने सन २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. या कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळाल्याने दि. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड झाली. आता २०१८
साली सर्व शासकीय विभाग तसेच लोकांच्या सहकार्याने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. यामध्ये वन विभाग ७.५ कोटी वृक्ष लावणार आहे. तर २.५० कोटी वृक्ष इतर शासकीय विभाग, ३ कोटी वृक्ष ग्रामपंचायतींमार्फत
लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी राज्यातील सार्वजनिक जागांची माहिती एकत्रित केली जावी, राज्यात वृक्ष लागवडीसाठी एकूण किती जागा उपलब्ध आहे याची “लॅण्ड बँक” तयार केली जावी अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.मनरेगाअंतर्गत १०० दिवसांऐवजी १५० दिवस काम उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी करणारे पत्र केंद्रीय मंत्री महोदयांकडे पाठवले जावे तसेच या विषयाचा राज्यातील लोकप्रतिनिधींना केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करता यावा यासाठी त्यांनाही या प्रस्तावाची माहिती देण्यात यावी असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. २०१८ च्या पावसाळ्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी वनमंत्र्यांनी रोप निर्मिती,वृक्ष लागवडीसाठी करावयाचे खड्डे, मनुष्यबळाची उपलब्धता यासारख्या विविध विषयांचाही आढावा घेतला.