कमकुवत अरुंद रेल्वे पूल येत्या दोन महिन्यात पाडून नवा बांधणार
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०५ – कल्याण डोंबिवली जोडणारा पत्री पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आता डोंबिवली रेल्वे स्थानकावरील कल्याण दिशेकडील ४० वर्षे जुना असलेला कमकुवत व अरुंद पूल येत्या दोन महिन्यात पाडण्यात येणार आहे. यामुळे डोंबिवली स्थानकावरही कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी एल्फिस्टन रेल्वे पुलावर चेंगरा -चेंगरी झाल्यानंतर रेल्वेने सर्व गर्दीच्या स्थानकावरील पुलांची पहाणी करण्यासाठी समिती नेमली होती या समितीने पहाणी करून डोंबिवली रेल्वे पूल गर्दीच्या मानाने खूप अरुंद असून तो पाडून रुंद पूल बाधण्याची शिफारस केली होती त्या नुसार रेल्वे प्रशासनाने कमकुवत व अरुंद पूल पाडून रुंद पूल बाधण्याचा निर्णय घेतला काही महिन्यांपूर्वी या पुलावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आर पी एफ ने रेल्वे स्टेशनवर पुलाचा वापर न करण्याचे आवाहन केले होते मात्र प्रवाशानी या बद्दल संताप व्यक्त करून पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी केली होती.
कल्याण दिशेकडील अरुंद पूल 40 वर्षा पूर्वीचा असून त्यावर अनेकदा गर्दी होते व प्रवाशांना धक्काबुक्की होते तसेच पूल कंपन सुद्धा पावतो हा पूल साडेचार मीटर रुंद असल्याने गर्दीच्या वेळेत पुलावर प्रचंड गर्दी होते म्हणून हा पूल पाडून दुप्पट म्हणजे सुमारे नऊ मीटर रुंद करण्यात येणार आहे यामुळे येत्या दोन महिन्यात हा अरुंद पूल पाडून नवा पूल बाधन्यात येणार आहे. पुलाच्या कामासादर्भात सर्वे पूर्ण झाला असून निविदा प्रक्रियेचे काम सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.
कल्याण दिशेकडील पूर्वेला जाणाऱ्या पुलावर मोठी गर्दी होते कारण भाजी मार्केट ,रिक्षा स्टॅन्ड ,बस स्थानक असल्याने प्रवासी याचा वापर जास्त करतात हा पूल बंद करण्यात आल्यानंतर पूर्व -पश्चिमेतील रिक्षा स्टॅन्ड हलवण्यात येणार आहे तर पश्चिमेला मासळी मार्केट ,फुले व गुप्ते रोड येथे जाणारी प्रवासी संख्या जास्त आहे यामुळे हा पूल बांधून होई पर्यंत डोंबिवलीकरांना किमान वर्षभर त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.
या संदर्भात स्टेशन प्रबंधक ए ओ अब्राहम यांना विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला प्रवाशानी मधल्या मोठ्या पुलाचा वापर करावा असे आवाहन केले यामुळे पूर्व पश्चिमेतील कल्याण दिशेकडील रोक्षा स्टॅन्ड मागे हलवण्यात येतील असेही ते म्हणाले व दोन तीन महिन्यात कामाला प्रारंभ होईल असेही ते म्हणाले.