औरंगाबादचे सैराट जोडपे बीड पोलिसांनी पकडले
बीड – गतवर्षी औरंगाबादमधून सैराट झालेल्या जोडप्याला बीड पोलिसांनी बुधवारी सकाळी औरंगाबादमध्ये पकडले. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केली.
१ फेब्रुवारी २०१७ रोजी मुकूंदवाडी (जि.औरंगाबाद) पोलीस ठाणे हद्दीतून पवन उर्फ प्रफुल्ल सुखदेव अवचार याने एका मुलीस पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला. मात्र त्यांना तपास न लागल्याने हे प्रकरण १३ जुलै रोजी बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे वर्ग करण्यात आले.
पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी याबाबत तपास सुरू केला. बुधवारी हे जोडपे औरंगाबादला येणार असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सापळा लावला. स्थानकात येताच या दोघांनाही बीड पोलसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुकूंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, पोह पी.वाय. वाळके, एस.सी.उगले, एस.एल.बहिरवाळ, एस.एस.शेख,एन.आर.खटाने आदींनी केली.