ओपन लॅड टॅक्स कमी करता तर मालमत्ता करही कमी करा ; मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांची मागणी
डोंबिवली- बिल्डरांनी पालिकेवर मोर्चा काढण्याने प्रशासनाने नमते घेत बिल्डर लॉबीसाठी ओपन लॅड टॅक्स कमी केला. मग नागरिकांचा विचार करून प्रशासनाने मालमत्ता कर कमी करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते प्रकाश भोईर यांनी पालिका आयुक्त पी. वेलारासू यांना दिलेल्या स्मरणपत्रात केली आहे.
२५ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षांनी बहुमताने बिल्डर लॉबीच्या हितासाठी १०० टक्के असलेला ओपन लॅड टॅक्स ३३ टक्के केला आहे. बिल्डरांना दिलेल्या करातील सवलतीप्रमाणे सामान्य नागरिकांच्या मालमत्ता करातहि सूट देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन आग्रह धरला होता. नागरिकांच्या मालमत्ता करातहि सूट देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत आणण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात २० फेब्रुवारी रोजी पार पडणा-या सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात आला नाही. जो पर्यत सामान्य नागरिकांच्या हितासाठी मालमत्ता करात ६७ टक्के सूट देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जात नाही, तोपर्यत मोकळ्या जागेवरील कर आकारणी ६७ टक्के करण्याबाबतच्या ठरावाची अमंलबजावणीकरण्यात येऊ नये असे मनसे जिल्हाध्यक्ष भोईर यांनी स्मरणपत्रात म्हटले आहे.