एेन उन्हाळ्यात डोंबिवलीत ११ तास बत्ती गुल….
डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेकडील बहुसंख्य भागात काल मध्यरात्री २ वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. एेन उन्हाळ्यात तब्बल ११ तास बत्ती गुल झाल्याने नागरिक हैराण झाले होते. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उकाड्याचा त्रास झाला होता. नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन केले असता फोन लागत नसल्याने नागरिक प्रचंड संतापले होते. तर काही नागरिकांनी कार्यालयात धाव घेतली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
मार्च महिन्यात उन्हाळा प्रचंड वाढण्याने विजेची मागणी वाढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांनी आनंदनगर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन केला असता फोन `नॉट रॉचेबल` लागल्याचे नागरिकांनी सांगितले. महावितरणचे अतिरिक्त उप अभियंता अविनाश कलडोणे यांना विचारले असता त्यांनी पाल सबस्टेशन मधून डोंबिवली येणाऱ्या वीज पुरवठ्यात ब्रेकर मध्ये बिघाड झाल्याचे सांगितले.यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात मंगळवारी सकाळी तर काही भागात दुपारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे सांगितले.