एमएमआरडीएच्या जागेवरील अनधिकृत ७५ निवासी इमारती सील करण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची धडक कारवाई

(श्रीराम कांदु)

ठाणे – कशेळी आणि काल्हेर परिसरातील एमएमआरडीएच्या जमिनीवरील ७५ निवासी अनधिकृत इमारतीं सील करण्याची मोठी कारवाई आज जिल्हा प्रशासनाने केली. यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर हे महसूल अधिकारी , कर्मचारी आणि पोलीस फौजफाटा घेऊन कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यासंदर्भात संबंधित  विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु राहणार आहे.

यासंदर्भात प्रांत अधिकारी डॉ संतोष थिटे यांनी माहिती दिली की, झालेल्या कारवाईचे पंचनामे सुरु आहेत. नव्या शर्तीच्या जागेवर झालेल्या या बांधकामासाठी ग्रामपंचायत, पालिका किंवा कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. या इमारतींपैकी काही पूर्ण झालेल्या निवासी इमारती असून काही अपूर्णावस्थेत आहेत. अपूर्ण इमारतींचा पंचनामा करण्यात येऊन त्यांची कागदपत्रे रीतसर तपासून मग त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु होईल. ज्या इमारती बांधून पूर्ण आहेत त्याबाबतीत त्या शासनजमा करण्याची कारवाई होईल.सध्या भिवंडी पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. या इमारतींमध्ये कुणीही रहात नव्हते, त्यापैकी काही बांधून तयार होत होत्या.

आज दुपारपासूनच ही कारवाई सुरु झाली. यावेळी पोलीस उपायुक्त पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. याशिवाय उपजिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार शशिकांत गायकवाड, नायब तहसीलदार संदीप आवारी तसेच त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की, पर्यावरण संरक्षणाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून विशेषत: कशेळी, काल्हेर येथील कांदळवनाचा नाश करून बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी येत होत्या, एमएमआरडीए जमिनीवर देखील अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारींची दाखल घेऊन हे पाउल उचलले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email