एमआयडीसीच्या  जलवाहिनीतून  छिद्रे पाडून ‘पाणी चोरी’ सुरूच

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरी भागात मंगळवारी तर ग्रामीण भागात शुक्रवारी पाणी कपात लागू केली केल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना,उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांमधून वाहने धुण्याची सर्वीस सेंटर आणि हॉटेलचालकांसाठी हजारो लिटर पाण्याची चोरी पाणीमाफियांकडून होत असल्याचे दिसत आहे.मात्र यावर कारवाई करण्यात एमआयडीसीचे अधिकारी हतबल झाले आहेत 
      एमआयडीसीच्या तीन जलवाहिन्या बारवी धरणाच्या पायथ्यापासून नेवाळी नाका, बदलापूर, अंबरनाथ, खोणी गावाहून, कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याजवळ आणण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये चोवीस तास पाणी भरुन ठेवण्यात येते. याच जलवाहिन्यांतून नवीमुंबई,ठाणे ,मिरा-भाईंदर,कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो.मात्र सध्या या जलवाहिन्या पाणी माफियांच्या रडारवर असून या जलवाहिन्यांतून दिवसाला हजारो लिटर पाणी चोरून त्याचा व्यावासायिक वापर केला जात आहे.कारण अंबरनाथपासून ते शिळफाटा, असे सुमारे १० किलोमीटरच्या परिसरात अनेक सर्व्हीस सेंटर आहेत. या ठिकाणी सेंटरचे चालक-मालक बिनधास्तपणे नजीकच्या जलवाहिनीला छिद्रे पाडून त्यामधून अनधिकृत नळजोडण्या घेऊन अनधिकृत  करत आहेत. शिवाय परिसरातील हॉटेल, ढाबे, खानावळ एमआयडीसीच्या या जलवाहिनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. यातील अनेक ढाबे व हॉटेल्सना कोणत्याही प्रकारचे परवाने नसतानाही शासकीय यंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करत त्यांचे धंदे अव्याहतपणे सुरू असल्याचे दिसत आहेत. त्यातच टँकर माफियादेखील अपवाद राहिलेले नाहीत. त्यामुळे एकीकडे पाण्याची उधळपट्टी सुरू असून  दुसरीकडे सामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेत. पाणीचोरीचा हा सर्व प्रकार एमआयडीसी प्रशासनाला माहिती असून  व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांची ही  मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत .एकीकडे कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा  सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे मात्र एमआयडीसीच्या जलवाहिन्या फोडून सर्रास पाणी चोऱ्या होत आहे.  दरम्यान बदलापूर पाईपलाईन रोड, तसेच काटई टोलनाका परिसरात असलेले बहुतांश कार सर्व्हिस सेंटर , हॉटेल, ढाब्यांवरही  राजकीय वरदहस्त असल्याने येथील व्यावसायिक एमआयडीसीच्या फुकटच्या पाण्याचा मनसोक्त वापर करून रोज भरभरून लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email