‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत छत्रपती शिवरायांचा इतिहास ; हिंदुत्ववादी संघटनांच्या लढ्याला यश
छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे आदी राष्ट्रपुरुषांच्या योगदानामुळे आज हिंदु समाज अभिमानाने जगत आहे. दुर्दैवाने केंद्रीय स्तरावरील ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत गेली कित्येक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 6 ओळींत शिकवला जात होता, तर महाराणा प्रताप यांचा नाममात्र उल्लेख या पुस्तकात होता; मात्र अकबर, बाबर आदी मुघल आक्रमकांचा इतिहास पानेच्या पाने भरून इतिहास शिकवला जात होता. वर्ष 2008 पासून हिंदु जनजागृती समिती या विषयी राष्ट्रीय स्तरावर विविध हिंदुत्ववादी संघटनासह आंदोलने करत आहे; परिणामी वर्ष 2008 मध्ये गोवा शासनाने समितीच्या आंदोलनाची दखल घेत इतिहासाचे पुस्तक रहित केले आणि छत्रपती शिवराय, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या धड्यांचा समावेश करून नवीन पुस्तक विद्यार्थ्यांना दिले; मात्र मुघलांचा आदर्श मानणारी काँग्रेसी सत्ता महाराष्ट्रात आणि दिल्लीत ठाण मांडून बसली असल्याने त्यांना याकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही. वर्ष 2014 मध्ये हिंदुत्ववादी शासन सत्तेवर आल्यानंतरही या विषयाचा अनेकदा पाठपुरावा केला, त्यामुळे आजअखेर या लढ्याला यश आले. हे यश समस्त हिंदुत्ववादी आणि शिवप्रेमी संघटनांच्या सामूहिक प्रयत्नांचे आहे. तसेच या विषयाचा सातत्याने विधीमंडळात आणि संसदेत पाठपुरावा करणार्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचाही या यशात मोठा वाटा आहे. पुस्तकात बदल करून भारतीय राजांना त्यात स्थान देणार्या केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचेही हिंदु जनजागृती समिती मनापासून आभार व्यक्त करते. तरी प्रत्यक्ष पुस्तक छापून आल्यावर त्यामध्ये छत्रपती शिवरायांना योग्य तो न्याय दिला गेला आहे ना, हे पाहून समिती आपली पुढील भूमिका स्पष्ट करेल, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.