एक नवे राजकीय समीकरण? महाराष्ट्र राष्ट्रवादी नवनिर्माण सेना – शेखर जोशी

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात येईल. पण एक मार्ग जर अवलंबला तर राष्ट्रवादीचे अस्तित्व निदान महाराष्ट्रापुरते तरी कायम ठेवता येईल. तो मार्ग म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांचा मनसे पक्ष महाराष्ट्रापुरता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करुन महाराष्ट्र राष्ट्रवादी नवनिर्माण सेना या नावाने नवीन पक्षाची स्थापना करायची. हे नवे राजकीय समीकरण कदाचित नवा इतिहासही घडवू शकते.

सध्या राष्ट्रवादी आणि मनसे यांची अवस्था आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. नावात राष्ट्रवादी असलेला पक्ष आता फक्त महाराष्ट्रवादी नव्हे पश्चिम महाराष्ट्रवादी झाला आहे आणि इकडे मनसेकडे सध्या एकही आमदार, खासदार नाही. दोघांनाही आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. तसेही राष्ट्रवादी, मनसे हे दोघेही सध्या एकाच नावेतील प्रवासी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ आलेले आहेतच. मग याचाच फायदा दोन्ही पक्षांनी करून घ्यायचा.

काय करायचे? तर शरद पवार यांनी तिकडे त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन केला की इकडे राज ठाकरे यांनी आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन करायचा. असे जर झाले तर त्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण राष्ट्रवादी सेना असे ठेवता येईल. म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अस्तित्वही कायम राहील आणि मनसेलाही या निमित्ताने नवी उभारी घेता येईल. शरद पवार यांनी हे असे करण्यासाठी राज ठाकरे यांना विनंती केली तर सर्व अभिनिवेश, अहंम सोडून पवार यांच्या या विनंतीचा राज ठाकरे यांनी स्वीकार करायला काहीच हरकत नाही.

असे घडेल का? असे होऊ शकते का? मनसे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याला तयार होतील का? असे घडणे शक्यच नाही, हा सगळ्यात मोठा
विनोद आहे, हे हास्यास्पद आहे, हे स्वप्नरंजन आहे, असेही काही जणांना वाटेल. पण राजकारणात काहीही घडू शकते हे या आधीही आपण पाहिले आहे. त्यामुळे हे घडेल किंवा घडणारच नाही असे ठामपणे सांगता येणार नाही. तसेही कोणतीही खेळी करणारे राजकारणी म्हणून पवार यांची प्रसिध्दी आहेच.

असे जर खरोखरच झाले तर महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय होईलच पण कदाचित नवा राजकीय इतिहासही लिहिला जाऊ शकतो. विधानसभा निवडणूक आता येत्या काही महिन्यांत होणारच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राष्ट्रवादी नवनिर्माण सेना हे नवे समीकरण तयार होऊ शकते.
बघू या, काय काय घडताय?

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email