एकतर्फी प्रेमवीराचा प्रताप आत्महत्येसह बदनामीची धमकी देऊन तरूणीवर बलात्कार – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२१ – एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका प्रेमवीराचा प्रताप पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून समोर आला आहे. लग्नासाठी तगादा लावून आत्महत्येची धमकी देऊन होणाऱ्या नवऱ्याला सांगून बदनामी करेन, असे धमकावून या प्रेमवीराने असहाय्यतेचा फायदा घेत तरूणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचे सदर तरूणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. स्वप्नील झेंडे (४०) असे आरोपीचे नाव आहे.
२५ वर्षीय पिडीत तरुणी डोंबिवली पूर्व परिसरात राहते. तिची कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडी गाव परिसरात राहणाऱ्या स्वप्नील झेंडे या जिम चालविणाऱ्या तरूणाशी ओळख होती. स्वप्नीलचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणीने नकार देताच त्याने तिला मी आत्महत्या करेन व कारणीभूत तू व तुझी आई कारणीभूत असेल अशी चिठ्ठी लिहून ठेवणार असे धमकावले.
तुम्हा दोघा माय-लेकीला अडकवेन, तुझ्या आईला ठार करेन, अशीही त्याने धमकी दिली. त्यानंतर त्याने तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सर्व सांगून तुझी बदनामी करेन, अशी देखिल धमकी दिली. एकतर्फी प्रेमवीराच्या धमक्यांमुळे पिडीत तरुणी घाबरली होती. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या प्रेमवीराने विविध ठिकाणी नेऊन या तरूणीवर अत्याचार केले. गेल्या सात वर्षांपासून आरोपी बलात्कार करत होता. अखेर या जाचाला कंटाळून या तरूणीने याबाबत मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी स्वप्नील झेंडे विरोधात गुन्हा नोंदवून त्याला सोमवारी सकाळी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि झेंडे करत आहेत.