उलट बसून येणाऱ्या प्रवाशांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली

सकाळी सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने लोकलला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अंबरनाथमधील अनेक प्रवासी अंबरनाथ रिटर्न ट्रेन पकडण्यासाठी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरला येऊन जागा पकडतात. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी लोकलला प्रचंड गर्दी असल्यानं अनेक प्रवासी सीएसटी रिटर्न लोकलमध्ये दोन स्टेशन आधी बसून येतात. परिणामी अनेक प्रवाशांना लोकलमध्ये बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे उलट बसून येणाऱ्या या प्रवाशांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली. 

मनसेच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी अंबरनाथ स्थानकात आलेल्या लोकलमधील या प्रवाशांना हुसकावून लावले. या प्रवाशांना लोकलमधून खाली उतरवत इतर प्रवाशांना जागा करून दिली. त्यामुळे अंबरनाथ स्थानकात तणाव निर्माण झाला होता. लोकलमध्ये प्रवाशांचे अनेक ग्रुप असतात, हे ग्रुप इतर सहकाऱ्यांचीही जागा अडवून ठेवतात आणि दुसऱ्या प्रवाशांना बसू देत नाहीत. शिवाय ट्रेन सुरू झाल्यावर पत्ते खेळणे, धिंगाणा घालणे असले प्रकार लोकलमध्ये सुरू असतात. ठाणे गेल्यानंतरही हे प्रवासी दुसऱ्या प्रवाशांना बसायला जागा देत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांना तास न् तास उभ्याने प्रवास करावा लागतो. परिणामी स्त्रिया, वृद्ध प्रवासी आणि आजारी प्रवाश्यांची गैरसोय होते. 

एखाद्या प्रवाशाने जागेसाठी वाद घातला तर हे संपुर्ण टोळकं त्याच्यावर धावून जाते. त्यामुळे लोकलमध्ये अनेकदा हाणामाऱ्याही होतात. केवळ अंबरनाथच नव्हे तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांमध्ये हे प्रकार सर्रास पाह्यला मिळतात. पश्चिम रेल्वेवर तर विराराला बसायलाही जागा मिळत नाही. लोकलमधील जागांची मक्तेदारी असल्यासारखं प्रवासी बसतात. या प्रकाराच्या तक्रारी आल्यानंतर मनसेने अंबरनाथमधील रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे या बाबतची रितसर तक्रार केली होती. त्यानंतर रिटर्न येणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वेने दोन-तीन दिवस कारवाई केली. 

ही कारवाई थांबल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अंबरनाथ स्टेशनमध्ये आंदोलन केले. तसेच सीएसटी रिटर्न ट्रेनमधील विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरहून बसून आलेल्या प्रवाशांना हुसकावून लावलं. सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याने अंबरनाथ स्थानकात तणाव निर्माण झाला होता. या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email