उध्दव ठाकरे याना कल्याण डोंबिवलीकरांचे पत्र,उध्दवजी, का थांबलात, कोणाची वाट पहात आहात.

साहेब, थांबू नका हि विनंती…

( म विजय )

मा.उध्दवजी ठाकरे,
शिवसेना कार्याध्यक्ष.

यांसी, सस्नेह जय महाराष्ट्र..!?

साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपली सत्ता येउन बरोबर दोन वर्ष पूर्ण झाली, महापौर पदाला सुध्दा २ वर्ष पूर्ण झाली, तशी महापालिका स्थापने पासुनच म्हणजे गेले २० वर्ष शिवसेनेचीच सत्ता, पण मधला काही काळ व आत्ताची परिस्थिती तशी वेगळी व तुमच्या साठी चांगली आहे, कारण पालिकेत तर तुमची सत्ता आहेच पण राज्यात पण तुम्ही व केंद्रात पण तुम्ही सत्तेत, सत्तेचे भागीदार..सर्वच स्तरावर सत्ताधारी, बरं महापौर तुमचा, आमदार तुमचा,खासदार तुमचा व मंत्री सुध्दा तुमचेच….मग आम्हाला प्रश्न पडतो, साहेब, का थांबलात तुम्ही, कोणाची वाट बघताय..? दोन वर्ष झाले की सत्तेची, दोन वर्षात एक मिहणावे असं चांगलं विकास काम पूर्ण नाही, तुमच्या पदाधिकाॲयांनी सगळ्या सोयी सुविधांचा बट्ट्याबोळ करून ठेवलाय, करदाते नागरीक अक्षरश: जीव मुठीत घेउन जगतायत, बरं बोलायचं तर कोणाला बोलायचं…? बिचारे मतदान करून बसले ना..? म्हणुन ठरवलं, तुम्हालाच पत्र लिहुन कळवावे की कुठ घोडं अडलंय कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे..? का थांबला आमच्या सुसंस्कृत शहरांचा विकास..? कदाचीत राज्याच्या राजकारणातून वेळ नसेल किंवा स्थानिकांनी नेहमी प्रमाणे सबकुछ आलबेल चे खोटे चित्र तुमच्या समोर रंगवले असेल, म्हणून तर थांबला नाहीत ना..? अहो कल्याण डोंबिवलीकर गेले अनेक वर्ष त्याच त्याच समस्यांना सामोरे जात आहेत, अगदी छोटे पण महत्वाच्या काही समस्या येथे मांडतो..
१. आधारवाडी कचरा डेपो कधी बंद होणार..?

२. शीळ रोड व दुर्गाडी येथील रोजची वेळकाढू वाहतूक कोंडीतून मुक्तता कधी मिळणार

३. एमआयडीसी रहिवाशी विभागातील खड्डेमय रस्ते ज्यांचा दुरूस्ती खर्च अगदी नगन्य आहे ते रस्ते दुरूस्त कधी होणार..?

४. डोंबिवली प्रदूषण मुक्त होणार का…?

५. रहाटळे तलाव सुशोभीकरण व काळा तलाव (भगवा तलाव) सुशोभिकरण भाग-२ सुरू होणार का..?

६. कलेची नगरी म्हणून मान मिळवतो पण अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या समस्येतुन कलाकारांची आणि कलारसीकांची सुटका होणार का…?

७. जिथे सर्व स्थरावरील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले तेथे खेळाडूंसाठी ना सुविधा ना क्रिडा धोरण, सुरक्षे अभावी गर्दुल्यांचे अड्डे ठरलेली मैदाने सुरक्षीत करून क्रिडा धोरण ठरणार का..?

महोदय, कल्याण डोंबिवलीकरांच्या समस्या/प्रश्न अनेक आहेत त्याच तुम्ही दाखविलेली अनेक स्वप्ने सुध्दा आहेत, उदा. अपूऱ्या आरोग्य सुविधा, डब्यात गेलेली परिवहन सेवा, खड्डे, कचरा ह्या समस्यांसह शिव आरमार स्मारक, तारांगण, मत्स्यालय हे कधीही पूर्ण न होणारी स्वप्न हे २० वर्ष काय पुढील २० वर्ष पण आपले पदाधिकारी पूर्ण करू शकत नाहीत, पण वर दिलेल्या सात समस्या ह्या सहज सुटण्यासारख्या आहेत,कारण तेथील नगरसेवक आपले, औद्योगिक विकास खात्याचे मंत्री आपले, रस्ते विकास व सा.बांधकाम खाते मंत्री आपले, पर्यावरण,प्रदुषण नियंत्रण खाते मंत्री आपले, पालक मंत्री आपले, एक खासदार,एक आमदार आपले, बरं महापालिकेची तिजोरी म्हणजेच स्थायी समिती सभापती देखील आपले…मग सांगा साहेब येवढे हाताशी बळ असताना, सत्ता असताना आम्हाला प्रश्न तर पडणार ना.., अडलंय कुठे..? का विकास थांबलाय..? का सुटत नाहीत प्रश्न..?

नाशिकला मनसे ला फक्त ५ वर्षच सत्ता मिळाली, पण निधीची अडचणीचे कारण न देता मा.राज ठाकरे साहेब सरकारवर अवलंबून राहिले नाही, नाशिक शहर सुंदर देखणे करण्यासाठी त्यांनी “सीएसआर” फंड मिळवून आणला व विकास कामे मार्गि लावली, तुमचे पालक मंत्री वा इतर पदाधिकारी असं का करत नाही…? किंवा आपण स्वत: त्यांना असा फंड मिळवून देण्यास मदत वा सहकार्य का करत नाही..? आपण राज्याचे सत्ताधारी,मनात आणलेत तर अश्या शेकडो कंपण्या/उद्योजक उभे रहातील मदत करायला…मग पुन्हा प्रश्न, साहेब, का थांबलात…?
साहेब, परिस्थिती गंभीर आहे, कृपया कल्याण डंबिवलीकडे निवडणुकीत जसे लक्ष द्ता तसे लक्ष द्या, राज्यातील सत्ताधाऱ्यांना खाली खेचाल तेंव्हा खेचा पण येथील करदात्या नागरीकांसाठी तुमच्या स्थानिकांना आधी ताळ्यावर आणुन नागरीकांना विकास कामातून न्याय द्या…दोन वर्ष सर्वच ठप्प आहे, दोन वर्षांपूर्वी वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजतो दात बोलणारे, मोठ मोठ्या रकमेची अमिष दाखवून नागरीकांना फसवणारे तुमचे आत्ताचे सहकारी स्थानिक सत्तेचे भागीदार होउन तुम्हची शांत पणे मजा घेत मुग गिळून गप्प आहे…असो, ते तशेच आहेत, आपण मात्र गप्प बसु नका, थांबू नका, ठप्प झालेल्या, बंद पडलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला धक्का मारा…

साहेब, थांबू नका हि विनंती…

एक कल्याण डोंबिवलीकर,

राजेश शांताराम कदम..

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email