उत्तरपत्रिका जळीत प्रकरणी १४ कर्मचारी निलंबित
केज – येथील गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी तब्बल १४ कर्मचार्यांना निलंबित केले. तर गटशिक्षणाधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला आहे.
केज तालुक्यातील ११ परिक्षा केंद्रावरून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या १४२० उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री आठच्या दरम्यान या उत्तरपत्रिकांना आग लागून सर्व उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. यामुळे खळबळ उडाली होती. रविवारी सीईओ अमोल येडगे यांनी बीईओंसह एकूण १५ जणांना निलंबनाच्या नोटीस दिल्या होत्या. सोमवारी सकाळपासूनच या कर्मचार्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू होती. सीईओ येडगे यांनी १४ जणांच्या निलंबनाचे आदेश काढले तर बीईओंच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.