उड्डाण पूलावरील वाहतूकीची अंतिम तारीख ठरविण्यापूर्वी वाहतूक विभागाची परवानगी आवश्यक

डोंबिवली दि.२२ – मध्य रेल्वेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला येत्या 27 तारखेपासून कोपर उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिल्याचे वृत प्रसिद्ध होताच डोंबिवलीत खळबळ निर्माण झाली. डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असतांना जर हा पूल अचानक बंद केला तर डोंबिवलीकरांची मोठी कोंडी निर्माण होईल. रेल्वे प्रशासनाने पाठविलेल्या या पत्राला कल्याण डोंबिवली महापलिकेच्या शहर अभियंत्यांनी पत्र पाठवून रेल्वेकडून चार गोष्टीच्या खुलाशाची मागणी केली आहे व पुलावरील वाहतुकीची अंतिम तारीख ठरविण्यापूर्वी वाहतूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे असे सूचित केले आहे. शहर अभियंता सपना कोळी यांनी मध्य रेल्वेच्या अभियंत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे कि, पुलावरील वाहतूक बंद करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनांनी महापालिकेला आयआयटीचा ऑडीट रिपोर्ट सादर करावा.

रेल्वे व महापालिका यांचा खर्च वाटपाचा करारपत्र, दुरुस्तीचा अंदाज आणि निश्चित कार्यपद्धतीची वेळ याचा खुलासा करावा. या कामासाठीचा खर्च ठरविण्यासाठी तपशिलांची गरज असून डोंबिवली पश्चिमेला जोडणारा आरओबि हा प्रमुख दुवा आहे. या पुलावरील वाहतुकीची अंतिम तारीख ठरविण्यापूर्वी वाहतूक विभागाची पूर्व परवानगी घेणे जरुरीचे आहे तसेच तेथील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता स्थानिक पोलीस व रेल्वे यांच्यात संयुक्त चर्चा आयोजित करणे गरजेचे आहे. या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी गुरूवार 23 मे रोजी सकाळी 11.30 वाजता शहर अभियांतांच्या कार्यालयात उपस्थित राहावे असे कळविले आहे. या सर्व बाबींचा विचार करता येत 27 मे पासून कोपर पुलावरील वाहतूक बंद होणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email