उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने ठाकुर्ली रेल्वेस्थानकालगत फाटक सुरु

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – रेल्वे प्रशासनाच्या सिनिअर सेक्शन इंजिनियर विभागाने ठाकुर्ली रेल्वे स्थानकालगत असलेले फाटक सोमवारी सकाळपासून बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र नागरिकांना याची माहिती दिली नसल्याने याठीकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. ऐनवेळी याची माहिती दिल्याने वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. मात्र उड्डाणपुलाचे काम अर्धवट असल्याने पालिका विभागाने रेल्वे प्रशासनाला विनंती केल्याने पुन्हा फाटक सुरु करण्यात आले.

डोंबिवली पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन उड्डाण पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र  रेल्वे प्रशासनाच्या सिनिअर सेक्शन इंजिनियर विभागाने ठाकुर्ली रेल्वेस्थानकालगत असलेले फाटक सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता बंद करण्यात येणार असल्याचे डोंबिवली रेल्वे प्रबंधकाला लेखी आदेश दिले होते. मात्र डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेला एन वेळी पत्र दिल्याने वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. फाटक बंद होणार असल्याची माहिती नागरिकांना माहिती नसल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना रेल्वे प्रशासनाने पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. पालिकेचे प्रकल्प अधिकारी तरुण जुनेजा यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले,  स.वा. जोशी येथील नवीन उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.मात्र रेल्वे प्रशासनाने अचानक फाटक बंद करण्याचे आदेश दिल्याने यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला होता. सदर पुलावरील विद्युतचे काम व उर्वरित कामे अजून बाकी आहे.त्यामुळे सध्यातरी फाटक बंद करू नका, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल अशी विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान देत रेल्वे प्रशासनाने पुन्हा फाटक सुरु करण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published.