ईद- ए- मिलादनिमित्त भिवंडीत वाहतूक नियंत्रण
( श्रीराम कांदु )
ठाणे दि.२४: भिवंडीत १ डिसेंबर रोजी ईद- ए- मिलादनिमित्त मुस्लीम बांधवांतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याने मिरवणुकीच्या मार्गावर व परिसरातील वाहतूक सुनिश्चित राहावी याकरीता लोकांच्या सोयीसाठी पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.
वाडा बाजूकडून नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व वाहनांना पारोलफाटा(नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – हलकी वाहने कांबा रोड काटई खाडीपार या पर्यायी मार्गाने अजयनगर पर्यंत येवून इच्छीत स्थळी जातील व जड वाहने अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र.८ ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईन मार्गे इच्छित स्थळी जातील.
वडपा चेक पोस्ट मार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एस.टी. बसेसेसह धामणगांव जांबोळी पाईपलाईन नाका व चाविद्रा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – (अ) सर्व प्रकारची वाहने धामणगांव पाईपलाईन येथे उजवीकडे वळण घेवून पाईपलाईन मार्गे वाड्याकडे व पुढे इच्छीत स्थळी जातील.
(ब) तसेच एस.टी. बसेसे या आपले प्रवासी चाविद्रा जकात नाका या ठिकाणी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील.
ठाणे व कल्याण बाजूने जुना ठाणे आग्रारोडनेवाद बाजूकडे व चाविद्रामार्गे नाशिककडेजाणाऱ्या सर्व वाहनांना बागेफिरदोस मस्जिद पेट्रोलपंप या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सर्व प्रकारची वाहने बागेफिरदोस मस्जिद पेट्रोलपंप येथे उजवीकडे वळण घेवून नागांव रोडने इच्छित स्थळी जातील.
कॉटरगेट मस्जिद –रामभवन हॉटेल-चांदतारा मस्जिद, बुबेरे हॉटेल-पटेल मस्जिद उजव्या बाजूने पांजरपोल चौक मार्गे उजव्या बाजूस वळून पंडीत जवाहरलाल चौक (वंजारपट्टी नाका)-ममता हॉस्पिटलच्या बाजूने डावीकडे- मामा भांजा दर्गा पर्यंत या मिरवणुकीच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहन उभी करण्यास मनाई(NO PARKING )करण्यात येत आहे.
ही अधिसूचना ईद-ए- मिलाद च्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर रोजी दुपारी १४ ते २२.०० वाजेपर्यंत अमलात राहील सदरची अधिसूचना हि पोलीस वाहने , फायरब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही असे पोलिस उप आयुक्त,शहर वाहतूक शाखा अमित काळे यांनी कळविले आहे.