इंदिरा चौकात परिवहन थांब्यावर रिक्षा चालकांचा ताबा परिवहन प्रशासन हतबल
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१६ – डोंबिवलीत दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालला असून पूर्वकडील इंदिरा चौकात परिवहन थांब्यावर रिक्षा चालकांचा ताबा घेतला आहे. गेली वर्षभर ही परीस्थिती असून अश्या मुजोर रिक्षा चालकांच्या पुढे परिवहन प्रशासन हतबल झाल्याचे दिसते. येथील रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाचे धिंडवडे उडाले असतानाच आता परिवहन थांब्यांची जागाही हडप केली जाता आहे. परिवहन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बसेसचे नुकसान होत असून आता त्यांच्या थांब्यांवरही रिक्षा चालक अतिक्रमण करीत आहेत. थांब्यांव्यतिरिक्त बसेस उभ्या होत असल्याने बस प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे अधिकारी कामचुकार आहेत अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कल्याणात दिली. अधिकाऱ्यांचे फोटो आणि फोन नंबर फलकावर लावा म्हणजे नागरिकच त्यांना धडा शिकवतील असेही शिंदे यांनी सांगितले. डोंबिवलीत अशाच प्रकारचे अनुभव येथील नागरिकांना येत आहेत. परिवहन उपक्रमाच्या बसेस कोठेही लावल्या जात असून त्याचच त्रास वाहतुकिला होत आहे. बस थांब्याची जागेत रिक्षा उभ्या असून बस इतर ठिकाणी उभ्या केल्या जात असल्याने मुंबईहून येणाऱ्या-जाणाऱ्या चाकरमान्यांना पावसाळ्यात नव्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत डोंबिवली विभागीय कार्यालयातील बस नियंत्रक काहीच उत्तर देऊ शकले नाही यामुळे परिवहन अधिकारी संदीप भोसले यांच्याकडे चौकशी केली असता योग्य ती दाखल घेऊ अशी नेहमीच्या सरकारी पद्धतीची उत्तरे देवून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. तर मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी या विषयी ताबडतोब मार्ग काढुन जर परिवहन थांब्यावर कोणी कब्जा करीत असेल तर असे होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत परिवहन प्रवाश्यांना त्रास होणार नाही याची आम्ही दाखल घेऊ असे सांगितले.