आर एम भटच्या माजी विद्यार्थ्यांची  आगळी-वेगळी ‘गुरुदक्षिणा`

मुंबईतील परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या आर एम भट शाळेची स्थापना होऊन  २ सप्टेंबरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त शताब्दि वर्षाच्या पूर्वसंध्येला शाळेच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजता गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे व शिवसेना नेते खासदार संजय राऊत प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित रहाणार आहेत.या निमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी शाळेला आगळी–वेगळी  गुरुदक्षिणा दिली जाणार असल्याचे निवृत्त शिक्षक विकास काटदरे यांनी सांगितले.

कामगार वस्तीत गेले शतकभर गोखले शिक्षण संस्थेची आर एम भट शाळा विद्यादानाचे काम करत आहे. या शाळेतील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत असले तरी ते आपल्या शाळेला अजून विसरले नाहीत. ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेची आठवण त्यांना अजूनही आहे. इतकेच नव्हे तर ज्या शिक्षकांनी त्याना शिकवले ,कान धरला त्यानाही ते विसरले नाहीत. १९९२ साल असावे शाळेतेील विद्यार्थीप्रिय शिक्षक अशोक कोठावळे यांना मधुमेह झाल्याने त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले.त्यांना   शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होऊन  लागला. म्हणून माजी विद्यार्थी एकत्र आले. या विद्यार्थ्यानी शिवाजी मंदिरात एक कार्यक्रम  आयेाजित केला. त्यावेळी त्यांना एक सायकल भेट दिली व काही निधीपण दिला. माजी विद्यार्थ्याची ही पहिली ‘गुरुदक्षिणा`असेल. मध्ये बराच काळ लोटला. मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या होत्या. इंग्रजी माध्यमाचे स्तोम वाढू लागले होते. अशा  काळात २०१२ साली शाळेतील १९७५ सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी २५ वर्षानंतर शाळेत एकत्र जमले होते. ज्या वर्गात त्यानी शिक्षण घेतले. त्याच ३६ क्रमांकाच्या वर्गात ते जमले. शाळेत त्यांनी फेरफटका मारला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शाळेच्या वर्गाची दुरावस्था झाली आहे. आपण किमान आपल्या वर्गासाठी काही तरी करावे असा विचार त्या मुलांच्या मनात आला.त्यांनी सुमारे २ लाख रुपये जमा केले.

आपण ज्या ३६ क्रमांकाच्या वर्गात शिकलो. त्या वर्गाला रंगरंगोटी द्यायची व शाळेला गरज आहे त्या वस्तू द्यायच्या असा निर्णय घेतला.  त्याप्रमाणे त्यांनी शाळेच्या सभागृहातील खुर्च्या,वर्गाला रंग,बाक,वायरिंग असे सर्व करुन दिले व आपला वर्ग एकदम छान केला. शाळेसाठी आपण थोडेतरी केले या समाधानात सर्व विद्यार्थी आपल्या घरी गेले. या गोष्टीला थोडा काळ गेला. माजी विद्यार्थी शाळेत येत होते.त्यांनाही शाळेची अवस्था पाहून वाइट वाटत होते, असे विद्यार्थी एकत्र आले. त्यामध्ये अजित सावंत, संजय घागरे,संजय खानविलकर,ज्येाती राणे अलका वष्ट, हेमंत,स्वप्नील असे अनेक विद्यार्थी जमले. शाळेची अवस्था पाहून काही तरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यांना समजले की २०१८ मध्ये शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत हे लक्षात घेऊन शाळेच्या शताब्दि निमित्त आपण शाळेसाठी काही तरी करावे असे त्यांनासुचत नव्हते. काही शिक्षकांशी त्यानी चर्चा केली. 

शाळेला रंग रंगोटीची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले पण हे काम सोपे नव्हते.  पुन्हा एकदा शाळेत  त्या बैठकीत विविध बॅचच्या विद्यार्थ्याना एकत्र करायचे तर मोठया प्रमाणात कार्यक्रम  करायचा असे ठरले.सर्वांना पुन्हा एकदा शाळेत यायला आवडेल हे लक्षात घेऊन १८ जानेवारी २०१५ साली ‘पुन्हा एकदा शाळेत` हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. सोशल मिडीया,वर्तमानपत्रांचा उपयोग करुन विद्यार्थ्याना येण्याचे आवाहन करण्यात आले. साधारणपणे १५०० विद्यार्थी येतील असे वाटत असताना सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत आले. ते पण आपलं वय विसरुन पुन्हा शाळेच्या गणवेशात,डबा घेऊन त्या दिवशी सर्व विद्यार्थ्याना शाळेची अवस्था पाहून वाईट वाटले. सर्वांनी मिळून ठरवले की प्रत्येक बॅचने वर्गणी काढून आपला वर्ग दुरुस्त करून सुंदर करायचा. गेल्या १०० वर्षातील २४ बॅचमधील विद्यार्थ्यानी सुमारे ६५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करुन त्या निधीतून ३० वर्गखोल्या,२ शिक्षक खोल्या,२ स्वच्छतागृहे हे सर्व दुरुस्त करुन शाळेला नवे रुप दिले.यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वर्षभरात प्रभात फेरी,रांगोळी प्रदर्शन,आरोग्य शिबिर,विद्यार्थ्याना एन डी ए ची सफर छात्रसेना दिन असे अनेक उपक्रम  राबवण्यात आले होते.यामुळे विद्यार्थी संघटीत झाले नी  शाळा  नवी कोरी झाली. 

गेल्या १०० वर्षात अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात नावारुपाला आले पण काही समाजासाठी  पडद्याआड काम करत आहेत अशा काही माजी विद्यार्थ्याचा प्रतिनिधिक गौरव येत्या १ तारखेला ‘आर एम भट रत्न ”म्हणून गौरव करण्यात येणार आहे.तर २ तारखेला शाळेच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शतायुशी शाळेत असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या दिवशी शाळेचे बदलेले नवीन पालटलेले वर्ग पाहण्यासाठी विद्यार्थी येणार असून आपण तयार केलेले वर्ग शाळेला अर्पण करणार आहेत. शाळा १०० वर्षे कामगार वस्तीत असूनही ज्ञानदानाचे काम करत आहे.याचे श्रेय सर्वच संस्था चालकांना असले तरी आर एम भट शाळेला लौकिक मिळवून दिला तो कै प्रि ना गो जोशी यांनी यानी.शाळेसाठी त्यानी विविध योजना राबवल्या पण कुठेही स्वत:चे नाव दिले नाही ना शाळेत कुठे आपला फोटो लावला.ही गोष्ट आजच्या सर्वच संस्था चालकांनी लक्षात घेऊन अनुकरण केले पाहिजे  असे वाटते 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email