आर्थिक विवंचनेतून शिपूरच्या बाप-लेकाची गळफासाने आत्महत्या
मिरज – येथील तालुक्यातील शिपूर येथे राजाराम विठोबा कांबळे (वय ७०) व दिलीप राजाराम कांबळे (वय ४५) या दोघा बाप – लेकांनी घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. वडील राजाराम कांबळे यास गळफास लावून दिलीप कांबळे याने नंतर स्वत:हून गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिरज ग्रामीण पोलिसात आत्महत्यांची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप कांबळे याला दारूचे व्यसन होते. दारूचे व्यसन त्याने काही महिन्यांपूर्वी सोडले होते. रोजंदारीवर कामाला जावून आर्थिक तजवीज करून घर बांधले होते. तसेच दिलीप याला थायरॉईडचा आजार होता. त्याच्यावर मिरजेतील डॉ.चव्हाण यांच्या रूग्णालयात उपचार सुरू होते.
आजाराला दिलीप कांबळे कंटाळला होता. तो कामालाही जावू शकत नव्हता. त्यात वडीलांचेही वय झाल्यामुळे ते ही घरातच होते. त्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळले होते. दिलीप यास तीन मुली व एक मुलगा आहे.