आर्थिकदृष्ट्या मागास विदयार्थ्यांसाठी माजीवडा येथे वसतीगृह १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

(म.विजय)

ठाणे दि.१३ – आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह म्हणून ठाणे महानगरपालिकेने माजीवडा येथे ३ मजली इमारत जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिली असून काल दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, आदींनी या ठिकाणी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ठाणे तहसीलदार अधिक पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते

पोखरण रोड २ येथे ओसवाल पार्कसमोर, उर्वी पार्कशेजारी असलेली ही इमारत मुलांसाठी वसतिगृह म्हणून उपयोगात आणली जाणार असून यात ८५ विद्यार्थी राहण्याची सोय असेल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली. स्वातंत्र्यदिनी या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात येईल.

मागासवर्गीय विद्यर्थ्यांसाठी राज्यात वसतिगृह आहेत मात्र आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यर्थ्यांसाठी ती सोय नसल्याने शासनाने वसतिगृह योजना आणली आणि जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली तिची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन याबाबत पालिकेशी चर्चा करण्यात आली होती.

कोण प्रवेश घेऊ शकतो ?

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक 8 लाख रुपये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आहे अशा विदयार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या विनंतीनंतर ठाणे महानगरपालिकेने वसतिगृहासाठी इमारत उपलब्ध करून देण्यास होकार दिला होता. प्रवेश आदी बाबींसाठी नोडल अधिकारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य, व समाज कल्याण अधिकारी असतील.
या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बँकेत १३ जुलै २०१८ च्या निर्णयात नमूद केल्याप्रमाणे निर्वाह भत्ता जमा होईल

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email