आयुर्वेद उपचार पद्धतीतून जलद वेदनाशमन पद्धती ; डॉ. व्यंकटेश धर्माधिकारी
ठाणे –आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीतून अतिशय आश्चर्यकारकरित्या जलद वेदनाशमन पद्धती विकसित झाली असून आयुर्वेद हे निरोगी आणि निरामय जीवनाचा मूलमंत्र बनल्याचे राज्य आयुर्वेद संचालनालयाचे सहायक संचालक डॉ व्यंकटेश धर्माधिकारी यांनी सांगितले. ते येथील ज्ञानराज सभागृहात आरोग्यधाम संस्थेतर्फे आयोजित “आयुर्वेद वसंत” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, विरोधी पक्ष नेता मिलिंद पाटील, मुंबईच्या माजी महापौर डॉ शुभा राउळ, भय्यासाहेब इंदिसे आदींनी या उपक्रमाबद्धल डॉ उदय कुलकर्णी आणि डॉ.मधुरा कुलकर्णी याना शुभेच्छा दिल्या.
डॉ धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले की, आम्हाला आमच्याकडे जास्त संख्येने रुग्ण यावेत असे कधीही वाटत नाही उलटपक्षी रुग्णाचा त्रास समूळ नष्ट होऊन तो निरामय जीवन कसा जगेल हे प्रत्येक आयुर्वेदिक वैद्य पहातो. आयुष महाराष्ट्र आयुर्वेद प्रसारासाठी आणि प्रोत्साहनासाठी कसा प्रयत्न करीत आहे याची माहिती त्यांनी दिली.
डॉ कुलकर्णी यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, विद्धाग्नि पद्धतीने सांधेदुखी, पाठदुखी, जखडलेल्या सांध्यांच्या वेदनांपासून झटपट मुक्तता मिळविता येते.
१८ फेब्रुवारीपर्यंत ठाणे महापालिकेशेजारील ज्ञानराज सभागृहात कार्यक्रम व शिबीर सुरु राहणार असून या उपक्रमात रोज सकाळच्या सत्रात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी,आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन,आयुर्वेदिक उपचार पद्धतीमधील आधुनिक उपचारपद्धतींबाबत प्रात्यक्षिके,तात्काळ वेदनाशमन करणाऱ्या विध्द आणि विद्धाग्नि उपचारपद्धतींबाबतची माहिती आणि आरोग्यविषयक विविध उपयुक्त आणि महत्वपूर्ण प्रदर्शने आदींचा समावेश असणार आहे.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या आयुर्वेदावरील चित्र प्रदर्शनाला देखील उपस्थित नागरिकांनी भेट देऊन प्रशंसा केली