आमदार आव्हाडांच्या प्रयत्नांना यश ,विटावा ते कोपरी पुलाचा मार्ग मोकळा

आत्माराम पाटील चौक ते कळवा रस्ताही होणार

ठाणे – कळवा खाडी पुलावर तिसर्‍या पुलाचे काम सुरु असतांना आता शासनाने विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पुलाची उभारणी करण्यास आणि कळवा ते आत्माराम पाटील चौक या दोन महत्वाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही कामे ठामपाने करावित, असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले होते. यावर कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना विधानसभेतील आश्वासनाचे स्मरण आ. जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिल्यानंतर विटावा पुलाची जबाबदारी ठाणेे महापालिकेने घ्यावी आणि आत्माराम पाटील चौक रस्त्याच्या कामाची जबाबदारी शासन घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही सहभागी झाले होते. 

विटावा ते कोपरी खाडी पुल उभारण्यात यावा; तसेच कळवा नाका ते आत्माराम पाटील चौक या रस्त्याचे काम करण्यात यावे, ही मागणी मागील हिवाळी अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावून धरली होती. सुरुवातीला ही दोन्ही कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेवरील ताण कमी होणार असल्याचे दिसत होते. परंतु मागील आठवडयात, शासनाने या दोन्ही कामांना मंजुरी दिली. शासनाने या विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे. तसेच कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्ता रुंदीकरण आणि सेवा रस्त्याचा प्रकल्प मार्गी लावण्याबाबतही हिरवा कंदील दिला आहे. या दोन्ही प्रकल्पांची कामे ठाणेे महापालिकेने करावी, असेही शासनाने आदेशात नमुद केले होतेे. या पुलाच्या बांधकामासाठी ठाणे महापालिकेला तांत्रिक सहाय्याची आवश्यकता भासल्यास आवश्यकतेनुसार एमएमआरडीएने सहाय्य करावे,असेही आदेशात नमुद करण्यात आले होते. त्यामुळे या दोनही कामांचा 800 कोटींचा बोजा हा सरसकट पालिकेवर पडणार होता. पालिका मात्र यासाठी तयार होईल ही आशा फोल ठरणार होती. त्यामुळेच आ. आव्हाड यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदरची दोन्ही कामे ही राज्य शासनाकडून केली जाणार असल्याचे आश्वासन विधानसभेत दिले असल्याचे स्मरण करुन दिले. तसेच, याबाबत काही तोडगा निघतो का? अशी मागणी केली. त्यानुसार यावर साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर विटावा ते कोपरी खाडी पुलाचे काम हे ठाणे महापालिकेने करावे आणि कळवा ते आत्माराम पाटील चौकाचे काम हे शासनाकडून करण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email