आफ्रिकेला पाठबळ पुरवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला आफ्रिकी नेतृत्वाची सर्वसहमतीने मान्यता- उपराष्ट्रपती

आफ्रिकेतील बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि मलावी या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मंगळवारी पहाटे मायदेशी परतले. त्यांच्या या आठवडाभराच्या दौऱ्‍यात त्यांनी बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वीट्सी, झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनांगाग्वा आणि मलावीचे राष्ट्राध्यक्ष पीटर मुथारिका यांच्याशी विविध मुद्यांवर व्यापक चर्चा केली. आफ्रिकेशी आपले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच निर्धारित केलेल्या दहा मार्गदर्शक सिद्धांतांना अनुसरून ही चर्चा करण्यात आली.

उपराष्ट्रपतींच्या या भेटीचे महत्व अनन्यसाधारण होते कारण या तीन देशांना भारताच्या वतीने बऱ्‍याच वर्षांच्या कालखंडानंतर उच्चस्तरीय नेतृत्वाने भेट दिली आहे. झिंबाब्वेला तर तब्बल 21 वर्षांच्या कालखंडानंतर भेट देण्यात आली. या तिन्ही देशांमध्ये उपराष्ट्रपतींचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले. बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी शिष्टाचार बाजूला ठेवून मोझांबिकहून परत येऊन नायडू यांची ते झिंबाब्वेला निघत असताना भेट घेतली. झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनांगाग्वा यांनी एक तासापेक्षा जास्त काळ नायडू यांच्याशी दोन्ही देशांच्या हिताच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. तर मलावीच्या राष्ट्राध्यक्षांनी नायडू यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.

उपराष्ट्रपतींच्या या भेटीमुळे आफ्रिकी देशांना भारताच्या वतीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या पातळीवर झालेल्या भेटींची संख्या 29 झाली आहे आणि भारताने केलेली ही कामगिरी अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एयर इंडिया वन या विमानात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या भेटीमुळे या भागातल्या देशांशी नवनव्या क्षेत्रात संबंध बळकट करणारा एक भक्कम पाया तयार झाला आहे आणि सध्या अतिशय दृढ झालेले हे संबंध एका नव्या उंचीवर न्यायला त्याची मदत होईल, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला. आफ्रिकेच्या विकासाच्या प्रक्रियेत आणि राजनैतिक, द्विपक्षीय आणि जनतेचा जनतेशी संपर्क आणखी वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये आफ्रिकेला पाठबळ देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला तिन्ही राष्ट्राध्यक्षांनी मान्यता दिली आहे, असे नायडू यांनी सांगितले. बहिष्काराच्या काळा झिंबाब्वेच्या पाठीशी खंबीरपणे राहिल्याबद्दल झिंबाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी खुल्या मनाने भारताचे आभार मानले, असे नायडू यांनी सांगितले. या देशांमधील विविध प्रकल्पांसाठी देऊ केलेली मदत आणि कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाला हातभार लावल्याबद्दल तिन्ही देशांनी भारताचे आभार मानले आहेत.

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने उपराष्ट्रपतींनी मलावीमध्ये ‘मानवतेसाठी भारत’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. जगभरात ठिकठिकाणी भारताकडून सुप्रसिद्ध जयपूर फूट शिबिरांचे आयोजन होणार आहे आणि गरजू लोकांना आवश्यक ते पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून मलावीमध्ये ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांनी दोन दशकांहून अधिक काळ व्यतीत केला आणि भारताला वसाहतवादाच्या विळख्यातून स्वतंत्र करण्यासाठी अहिंसा आंदोलनाची सुरुवात करून आफ्रिकी नेत्यांना देखील त्यांच्या देशांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी संघर्षाची प्रेरणा दिली त्या ठिकाणी पहिल्या जयपूर फूट शिबिराचे उद्घाटन करण्याचा बहुमान उपराष्ट्रपतींना देण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते गरजूंना भारतीय बनावटीच्या कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email