आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पथके तयार ठेवा जिल्हा प्रशासनाच्या तहसिलदारांना सुचना
टोल फ्री क्रमांकही जाहीर
ठाणे – हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीबाबतच्या इशा-यानुसार येत्या काही दिवसात कोकण-गोवा व मुंबई येथे दि 8,9,10 आणि 12 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता दर्शविण्यात आली आहे या अनुषंगाने मदतकार्यास तयार राहावे तसेच विविध पथके तयार ठेवावीत अशा सुचना दिल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकरी अधिकारी, तथा निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सुचना दिली आहे. १०७७ हा टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२२२५३०१७४० असा राहील.
यासंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी , सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कडील बचावपथके, बोटी व बचाव साहित्य, पोहणाऱ्यांची यादी, संक्रमण शिबीरे, रूग्णवाहिका,औषधे इत्यादी सुविधा तत्पर व सतर्क ठेवण्याच्याही सूचना दिल्यात तसेच आपत्कालीन परिस्थितीत पंचनामा करण्या करीता, आपदग्रस्ताना मदत वाटपा करीता वेगवेगळी पथके तयारकरण्यात यावीत असे ही सूचित केले आहे. महत्वाचे अद्यावत दूरध्वनी क्रमांक तयार ठेवावेत असेही सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून सर्व संबंधितानी मुख्यालय सोडू नये तसेच सदर कालावधीत कुणाचीही रजा मंजूर करण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.