आनंद दिघे यांचा उपशाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख प्रवास : राज कल्याणकर यांच्या लेखणीतुन
(एम विजय )
ठाण्याचे पहिले शाखाप्रमुख डॉ. विजय ढवळे नंतर मनोहर गुप्ते, नाना प्रधान, उध्दव जगताप आदींच्या काळात सामान्य शिवसैनिक ते ठाणे शहराचे उपशहरप्रमुख अशी वाटचाल करतांना आनंद दिघे थेट उपजिल्हाप्रमुख झाले. परंतु उपशहरप्रमुखावरुन थेट उपजिल्हाप्रमुखपदाचा त्यांचा संघर्ष तत्कालिन शिवसैनिकांनी अनुभवला आहे. त्यानंतर जिल्हाप्रमुख झालेले आनंद दिघे हे एकमेव जिल्हाप्रमुख होते की राज्यातील प्रत्येक शिवसैनिकांना ते हवेसे वाटायचे किंबहूना शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसैनिकांचा सर्वात लोकप्रिय नेता ठरलेले आनंद दिघे यांच्या प्रतिमा आजही नाशिकच्या गोदातीरापासून वैष्णौदेवीपर्यंत पुजल्या जातात. संघर्षातून उभे राहिलेले तावून सुलाखून निघालेले हे नेतृत्व होते.
1971 साली दादरच्या रानडे रोडवर नव्याने सुरु झालेल्या भारतीय कामगार सेनेचे कार्यालय होते. सरचिटणीस अरुण मेहता कायम तेथे असत. तेथेच भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना झाली. त्यासमयी ठाण्याहून आनंद दिघे व विलास ठूसे आले होते. मोजक्याच शिवसैनिकांच्या उपस्थितीत भारतीय विद्यार्थी सेना सुरु झाली. परंतु विद्यार्थी सेनेत काम करण्यापेक्षा आनंद दिघे शिवसेनेतच रमले. नाना प्रधान शहरप्रमुख असतांना आनंद दिघे उपशहरप्रमुख झाले. त्याच दरम्यान 1974 साली ठाणे नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. थेट नगराध्यक्षपदासाठी विद्यमान नगरसेवक व जिल्हाप्रमुख सतिश प्रधान यांच्या नावाची घोषणा झाली.
ठाणे नगरपालिका जिंकण्यासाठी आनंद दिघे यांची जबाबदारी वाढली. काँग्रेस आणि जनसंघाचे तगडे उमेदवार होते. त्यावेळेस माझे पाचोळा साप्ताहिक सुरु होते. निवडणुका जाहीर झाल्या आणि आनंद दिघे यांनीही पाचोळा साप्ताहिकाची जबाबदारी घेतली. 1974 साली त्यावेळच्या ठाणे शहरातील घराघरात शिवसेनेच्या प्रचारासाठी पाचोळाचा अंक पोहचवला गेला.
ठाणे नगरपालिका जिंकली, सतिश प्रधान नगराध्यक्ष झाले. जिल्हाप्रमुख म्हणून गणेश नाईक यांची निवड झाली. परंतु उपशहरप्रमुख असलेले आनंद दिघे संपूर्ण जिल्ह्याचे काम पाहत होते. सतिश प्रधान जिल्हाप्रमुख असतांना जिल्ह्यातील प्रत्येक आंदोलनात त्यांचा प्रमुख सहभाग असे. मग ते दिव, दमण, उधवा येथील आंदोलन असो वा अन्य कोणतेही. त्यामुळे रात्रीचा दिवस करत जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचे काम आनंद दिघे करीत असत.
नव्या जिल्हाप्रमुखांनी टेंभी नाक्यावरील जैन मंदिरात एक बैठक बोलविली होती. आनंद दिघे यांचे जिल्हाभर तुफानी काम पाहता तेच जिल्हाप्रमुख होतील अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जमलेल्या शिवसैनिकांनी आनंद दिघे यांच्यावर कोणती जबाबदारी देणार याचा धोशा लावला. बैठकीने उग्र रुप घेतले होते. सतिश प्रधान, मो. दा. जोशी, गणेश नाईक, साबीर शेख सर्वच गप्प होते. आम्हाला निर्णय हवा असा शिवसैनिकांचा आग्रह होता. काळजी करु नका आनंद दिघे आमच्याबरोबर असतील असे साबीर शेख यांनी जाहीर केले. परंतु आमच्याबरोबर म्हणजे काय अशी विचारणा सुरु झाली. एकूण वातावरण पाहून आनंद दिघे यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून निवड जाहीर झाली. (त्यावेळी सर्व नेमणूका शिवसैनिकांच्या बैठकीत ठरायच्या व शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने मार्मिकमध्ये जाहीर व्हायच्या)
शिवसैनिकांच्या आग्रही मागणीमुळेच आनंद दिघे उपशाखाप्रमुखपदावरुन थेट उपजिल्हाप्रमुख झाले. सतिश प्रधान व साबीर शेख यांनी चाणाक्षपणे परिस्थिती हाताळली. उपजिल्हाप्रमुख झाल्यानंतर आनंद दिघे यांचे संघटनात्मक काम आणखी बहरले. जिल्हाप्रमुख गणेश नाईक यांचा मुक्काम ठाण्याच्या रमेश लॉजमध्ये असे. तेथूनच ते काम पाहत असत. परंतु जिल्ह्यातील सर्व आंदोलनांचे नेतृत्व आनंद दिघेंच करीत असत. उधवा येथील आंदोलनात शिवसैनिकांना झालेली मारहाण असो वा मलंगगडाचे आंदोलन संपूर्ण जिल्हाभर आनंद दिघे यांचाच संचार असे. गणेश नाईक यांच्यानंतर साबीर शेख जिल्हाप्रमुख झाले व नंतर आनंद दिघे यांच्या गळयात जिल्हाप्रमुखाची माळ पडली. त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेना संघटना ठाणे जिल्ह्यातील घराघरात पोहचली.
ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचे काम तत्कालिन जिल्हाप्रमुख सतिश प्रधान यांनी केले. तर आनंद दिघे यांनी संघटना घराघरात पोहचवून रुजविली. त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेनेचे काम करण्यासाठी पुढे येऊ लागले. संपूर्ण राज्यातून आनंद दिघे यांना मागणी सुरु झाली. `आनंद दिघे’ हा हक्काचा आधाराचा, धाकाचा असा परवलीचा शब्द झाला. जिल्हाप्रमुख म्हणून सामान्यांतला सामान्य ते मोठमोठ्या समस्यांची उकल आनंद दिघे यांनी केली. पुढे सतिश प्रधान, गणेश नाईक, साबीर शेख व अन्य नेत्यांना मोठमोठे पदे मिळाली. त्यांची वरपर्यंत उठबस सुरु झाली. अनेकदा या नेत्यांकडून अडवणूकही झाली तरीही तावून सुलाखून निघालेले नेतृत्व काळाच्या कसोटीवर उतरले. देशाच्या कानाकोपऱ्यात आनंद दिघे हे नाव पोहचले, नव्हे तो एक मंत्र ठरला.
एखाद्या सामान्य शिवसैनिकाने सुचविलेली कोणतीही सूचना, कल्पना योग्य असेल तर अंमलात आणण्याचे कसब त्यांच्याकडे होते. लोकसत्ता-गिरनारने 1990 साली गणेश दर्शन स्पर्धा सुरु केली. त्या स्पर्धेची ठाणे जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याच वेळेस आपणही ठाणे जिल्हा शिवसेनेतर्फे रोख रकमेची बक्षिसे देणारी स्पर्धा सुरु करुया अशी सूचना मांडली व त्याची तत्काळ अंमलबजावणी झाली. पुढील वर्षापासून रोख रकमेची बक्षिसे देणारी गणेशोत्सव स्पर्धा ठाणे जिल्हा शिवसेनेची ठरली. गणेशोत्सवा पाठोपाठ दहीहंडी, सार्वजनिक नवरात्र इत्यादी अनेक उत्सवांवर आनंद दिघे यांची छाप पडली.
माझी रास कुंभ आहे आणि कुंभ राशीची माणसे देवभोळी असतात असे ते नेहमी सांगत असत. देशाच्या सर्व भागातील साधू त्यांना खास भेटायला येत असत. हे त्यांचे संतपरंपरेतील एक वैशिष्ट आहे. 1970 ते 2001 पर्यंतच्या शिवसेनेतील अनेक आठवणी त्या सर्वांना उजळणी दिली तर तो एक थक्क करणारा प्रवास होता. परंतु हे सर्व मोठ्या संघर्षातून मिळाले आणि `आनंद दिघे’ या मंत्राने त्याचे सोने झाले.
…आणि आनंद दिघे यांची कॉलर पकडली
1975 साली देशात आणिबाणी पुकारण्यात आली. साबीर शेख यांच्यावर `मिसा’ लावण्यात आला. पोलीस साबीर शेख यांना शोधत होते. काही दिवस हुलकावणी दिल्यानंतर साबीरभाई पोलीसांच्या हाती लागले. साबीर शेख यांना झालेली अटक व कोठे नेणार हे सर्व गुप्त ठेवण्यात आले होते. परंतु ती बातमी आम्हाला समजली. रात्रौ उशिराच्या गाडीने साबीर शेख यांना विसापूर जेलमध्ये नेण्यात येणार आहे. आम्ही धावत पळत कल्याण रेल्वेस्टेशनवरुन गाडी पकडली. कोणाकडेही तिकीट नव्हते. गाडीत एक उंचापुरा भैया टिसी आला आणि थेट दाढीवाले आनंद दिघे यांना बघून त्यांची कॉलर धरली. मग गाडीतील शिवसैनिकांनी त्याला योग्य तो धडा शिकविला. साबीर शेख यांना सोडण्यासाठी आम्ही विसापूरच्या जेलच्या दरवाजापर्यंत गेलो होतो. आपलेपणाची भावना असलेला तो काळ होता.
-राज कल्याणकर