आधुनिक जगातल्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद अतिशय समर्पक – श्रीपाद नाईक

मुंबई, दि.२६ – आयुर्वेद, आरोग्य क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाश्वत, सुरक्षित पीडानाशक व्यवस्थापनातली आयुर्वेदाची शक्ती, वैज्ञानिक जगताला अधोरेखित करुन देण्याची गरज आहे. उच्च रक्तदाब, ताण, हृदयाशी संबंधित विकार यासारख्या आधुनिक जगातल्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेदाची भूमिका अतिशय समपर्क आहे असे आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज मुंबईत सांगितले. चौथ्या आंतरराष्ट्रीय आणि 12 व्या “आपकॉन 2018 ” राष्ट्रीय चर्चासत्रात ते आज बोलत होते.

जीवनशैलीशी निगडीत आजारांमुळे, आयुष औषध पद्धतीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या आगळ्या, सर्वसमावेशक आणि अनेकदा जुनाट आजारांवरच्या व्यवस्थापनाबाबतचा दृष्टीकोन यामुळे गेल्या काही दशकात युरोपियन देश आणि अमेरिकेत आयुर्वेद अतिशय लोकप्रिय ठरला आहे असे ते म्हणाले.

आयुर्वेदातल्या अनेक संकल्पना आणि प्रथा वैशिष्ट्यपूर्ण असून जनतेकडून तसेच जागतिक वैज्ञानिक आणि वैद्यकीय समाजाकडूनही त्याला मान्यता आणि पाठिंबा मिळत असल्याचे नाईक म्हणाले.

आधुनिक वैद्यक शास्त्र आणि आयुर्वेद एकत्र येऊन एक चमू म्हणून रुग्णासाठी उत्तम सेवा देतील असे एकीकृत क्लिनीकल सेंटर उभारण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली. सामाजिक आरोग्य क्षेत्रात आयुर्वेद मोठी भूमिका बजावू शकतो. भारतात प्रशिक्षित आयुर्वेद डॉक्टर मोठ्या प्रमाणात आहेत, या स्रोताचा योग्य रितीने वापर करुन घेण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आयुष मंत्रालय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय आयुष अभियान अर्थात “नाम” अंतर्गत प्रोत्साहन देत आहे.

शिक्षणाचा दर्जा राखण्याला आपले सरकार प्राधान्य देत असल्याचे नाईक म्हणाले. जनतेला उत्तम वैद्यक व्यावसायिक आणि उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आयुष शैक्षणिक संस्था उभारणे, विकसित करणे, त्यांचा दर्जा उंचावणे आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना आकर्षित करणे हे आयुष मंत्रालयाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपकॉन- 2018” या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत 700 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email