आधार नोंदणी संच त्वरित कार्यान्वित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना,आधार अपडेशन आता ५ पोस्ट कार्यालयातही होणार
( श्रीराम कांदु )
ठाणे दि ३: आधार नोंदणी बंद असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांचे याप्रकरणी आधार नोंदणी संच त्वरित कार्यान्वित करण्यास महाऑनलाईनला सांगावे अशा सुचना माहिती तंत्रज्ञान विभागाला केल्या आहेत.
राज्य शासनाने सीएससी-एसपीव्ही यांच्याकडील सर्व आधार नोंदणी संच शासनाच्याच अखत्यारीतील महा ऑनलाईनला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील २४५ पैकी केवळ १६० आधार नोंदणी केंद्र हस्तांतरित झाले मात्र फक्त १० संच काम करीत आहेत असे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी गंभीर दाखल घेतली असून तातडीने सर्व संच सुरु करावीत असे माहिती तंत्रज्ञान विभागाला कळविले आहे.
महाऑनलाईनने सर्व तहसीलदारांच्या कार्यालयातील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे सर्व ठिकाणच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत मात्र तरी देखील आधार केंद्रे कार्यान्वित झालेली नाही अशी वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली आहे.
आधार अपडेशन पोस्टातून
दरम्यान नागरिकांची आधार अपडेशन बाबत गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य टपाल कार्यालय, जिल्हा सामन्य रूग्णालयाजवळ, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम, उप टपाल कार्यालय, दमाणी इस्टेट, हरी निवास सर्कल, नौपाडा, मुख्य टपाल कार्यालय, टिळक चौक, कल्याण पश्चिम, उप टपाल कार्यालय, दीपक हॉटेलच्या मागे, कल्याण रेल्वे स्थानकाजवळ, उप टपाल कार्यालय, प्लॉट क्र. १४, दत्त मंदिराजवळ, सेक्टर १७, ऐरोली याठिकाणी अपडेशनची सुविधा देण्यात आली आहे, याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सुधारित आज्ञावली वापरावी
आधार माहिती अद्ययावत करण्यासाठी सध्या ECMP Client हि अद्यावली वापरण्यात येते मात्र त्यामुळे अपडेशन साठी १५ दिवसांचा विलंब लागतो . मोबाईल अपडेशन जलदगतीने व्हावे म्हणून युआयडीएआय ने Update Client Lite हे व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे मात्र या नव्या आज्ञावालीचा वापर होताना दिसत नाही त्यामुळे तो करावा असे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाने महाऑनलाईन च्या जिल्हा समन्वयक यांना दिले आहे.