आठ वर्षांनंतर शरद पवार यांच्या घराबाहेर होणार ठिय्या आंदोलन !

(म.विजय)

पुणे दि.०८ – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती शहरात चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असताना आत्ता दि ९ ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या माळेगाव(ता बारामती)येथील गोविंदबाग या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. 

तब्बल आठ वर्षांनंतर पवार यांच्या घरासमोर आंदोलन होत आहे हे विशेष. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. दि ९ ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.

सकाळी नऊ ते बारा या वेळेत हे ठिय्या आंदोलन होणार आहे,याबाबतची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, सत्ताधारी ते विरोधक असा राजकीय प्रवास करणाऱ्या शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर २००७ साली उसदरासाठी झालेल्या आंदोलनाचा अपवाद वगळता गेल्या आठ वर्षात एकही आंदोलन झाले नव्हते. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने हा इतिहास पुन्हा जागा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.