आज पासून पं. राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात गडकरी रंगायतनमध्ये रंगणार शानदार सोहळा

 

( म विजय )

ठाणे : कलेचा आणि कलावंताचा सन्मान करणारा, शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या ठाण्याचा  प्रतिष्ठेचा पं. राम मराठे संगीत महोत्सवाला यावर्षी दिनांक ३१ ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे.  ठाणे महापालिकेच्यावतीने  आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ,ठाणे शाखा यांच्या सहकार्याने या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे .दिल्ली येथील प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका विदुषी मिता पंडित यांच्या गायनाने या महोत्सवाची सुरुवात होत असून नृत्य,नाट्य , गायन ,वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या  कला सादरीकरणाने यंदाचा पं.राम मराठे संगीत महोत्सव साजरा होणार आहे .तरी ठाण्याच्या संगीतप्रेमी रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे . दिनांक ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे  हा  संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे .

या संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, यांच्या उपस्थितीत आणि महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.  यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश मस्के,विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त  (अतिरिक्त कारभार ) सुनील चव्हाण, आदी उपस्थित राहणार आहेत.

संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी रात्रौ 8.00 वाजता पं.रोणू मुझुमदार यांच्या  बासरीवादनाने , तर  दिल्लीच्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका विदुषी मिता पंडित यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सुरुवात होणार आहे .दिनांक १ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्रौ .८.३० वाजता श्रीमती गौरी पाठारे यांचे  गायन असून पं .शुभंकर बॅनर्जी कोलकत्ता  यांच्या तबला वादनाने समारोप होईल . गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘संवाद’ प्रस्तुत चार शास्त्रीय नृत्यशैलीचा अनोखा संगम ” नृत्यविविधा’ सादर होंणार असून यामध्ये पद्यश्री श्रीमती दर्शना झवेरी(मणीपुरी) ,श्रीमती प्रतिशा सुरेश (सत्रीया) ,श्रीमती सुजाता नायर  (मोहिनीअट्टम),श्रीमती  भावना लेले (कथ्थक )यांचा सह्भाग असणार आहे . रात्रौ १०.०० वाजता पं. राजा काळे यांच्या गायनाने गुरुवारच्या सत्राचा समारोप होणार आहे .

शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्रौ ८.३० वाजता ‘तारांकित ‘आयोजित गानसरस्वती स्व. किशोरी आमोणकर यांच्या गायकीचे दर्शन घडविणारा “म्हारो प्रणाम ” हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे . नंदिनी बेडेकर, तेजश्री आमोणकर,आणि पं.रघुनंदन पणशीकर आदी  हा  कार्यक्रम सादर करणार असून  नरेंद्र बेडेकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत .शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता  पहिल्या सत्रात डॉ. श्रीमती पल्लवी नाईक यांचे भरतनाट्य तर श्रीमती दिपीका भिडे ,आणि डॉ श्रीमती वरदा गोडबोले यांचे गायन होणार आहे . संगीत नाटकांचा रसिकवर्ग ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. या संगीत नाट्यप्रेमींसाठी  दुपारच्या सत्रात  ४ .०० वाजता ‘दि गोवा हिंदू असोसिएशन ,कला विभाग’ प्रस्तुत ‘मस्त्यगंगा ‘हे संगीत नाटक सादर होणार आहे . कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने  कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामुल्य असून रसिकांना प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी एक तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध होतील.  तरी याचा सर्व संगीत रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email