आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याच्या निवडणूक निरीक्षकांच्या सुचना
(श्रीराम कांदु)
ठाणे दि ७: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान सोशल मिडीयाचा गैरवापर होत नाही आहे ना याकडे काटेकोर लक्ष ठेवावे तसेच पेड न्यूज समिती, भरारी पथकांनी, बँकांनी अधिक दक्ष राहून आचारसंहितेचा भंग होऊ नये याची कालजी घेण्याच्या सुचना निवडणूक निरीक्षकांनी आज दिल्या.
नियोजन भवन येथे आज सकाळी आदर्श आचारसंहितेच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला तसेच उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली.
यावेळी ८१८ झेंडे, पोस्टर्स काढल्याची माहिती देण्यात आली. यात भिवंडीतून ३१३, कल्याण २३४, अंबरनाथ ५५, शहापूर १५६, मुरबाड ७० झेंडे, पोस्टर्स काढले. शहापूर येथून १४ ठिकाणाची भिंतीवरील जाहिरात पुसण्यात आली.
निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरीकर ( अंबरनाथ क्षेत्राची जबाबदारी), वैदेही रानडे ( कल्याण-मुरबाड क्षेत्राची जबाबदारी), विवेक गायकवाड ( भिवंडी- शहापूर क्षेत्राची जबाबदारी) यांनी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करून सुयोग्यरीतीने व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात यादृष्टीने सुचना केल्या. प्रारंभी उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी तयारीची माहिती दिली.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच पेड न्यूज प्रकारातून वृत्तपत्रांतून प्रसिध्द होणार्या बातम्या तसेच मजकूर तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेड न्यूज समितीच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील यावर लक्ष ठेवावे, भरारी पथकांनी अधिक दक्ष राहून कार्यवाही करावी, बँकांनी विशेषत: जिल्हा बँकांनी त्यांच्या खात्यात भरण्यात येणाऱ्या मोठ्या रक्कमा किंवा मोठी रक्कम जर संशयास्पद वाटली तर लगेच कळवावी असेही निरीक्षकांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी देखील उपस्थित होते.
जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे श्रीम. आशा तामखेडे, तहसिलदार, पुरवठा विभाग 9768720750; निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण यांचे कार्यालय श्री. एस.पी. कुलकर्णी, उपअभियंता, बांधकाम विभाग,पं.स. कल्याण 9881844111; निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडी 1 व निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडी 2 यांचे कार्यालय श्री. अविनाश मोहीते, सहा. गट विकास अधिकारी, पं.स. भिवंडी 9167966099, 9765365333; निवडणूक निर्णय अधिकारी मुरबाड यांचे कार्यालय श्री. एस. ई. हाश्मी,गटविकास अधिकारी, पं.स. मुरबाड 8378037140; निवडणूक निर्णय अधिकारी शहापूर 1 व निवडणूक निर्णय अधिकारी शहापूर 2 यांचे कार्यालय श्री. राघवेंद्र घोरपडे; गटविकास अधिकारी, शहापूर 9579704525;निवडणूक निर्णय अधिकारी अंबरनाथ यांचे कार्यालय श्री. आर. एच. पाटील, विस्तार अधिकारी, पं.स. अंबरनाथ 9881844111