आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्वतयारी
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच प्रमुख पक्षांकडून विविध स्तरांवर तयारी सुरू आहे. शहरातील अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत संघटनात्मक बांधणीतील अपयशाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने आगामी निवडणुकांमध्ये हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्वतयारी सुरू केली आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षांकडून संघटना भक्कम करण्याकडे लक्ष दिले जात असताना, मनसेला स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात विशेष यश लाभले नव्हते.
पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिमा आणि उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क यावरच पक्षाचा भर असायचा. त्याचा मोठा फटका गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये सहन करावा लागल्याने आता संघटना बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यातूनच, शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण केल्यानंतर आता निवडणूक यंत्रणेसाठी अधिक सक्षम फळी निर्माण करण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे.
मतदार यादी ही कोणत्याही निवडणुकीचा अविभाज्य भाग असल्याने भारतीय जनता पक्ष किंवा इतर राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच एक हजारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय विभागीय सचिवांची नियुक्ती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेच्या प्रमुखपदाची जबाबदारी संबंधित सचिवाकडे असेल. आगामी काळात यादी भागानुसार साडेतीनशे ते चारशे कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचे उद्दिष्ट मनसेने निश्चित केले आहे. मतदार नोंदणीपासून ते यादीतील नागरिकांशी संपर्क वाढविण्यावर पक्षातर्फे भर दिला जाणार आहे.