आई-वडिलांना नारळपाण्यात विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न
लातूर – लातूर शहरातील मोरेनगर भागात मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यात विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा मृत्यू झाला. तर आईची प्रकृती अत्यवस्थ आहे. रात्री ९ च्या सुमारास मुलगा ज्ञानदीप कोटंबे याने त्याच्या आई वडिलांना नारळ पाणी दिले. नारळ पाणी कडवट का लागते आहे? असे या दोघांनी मुलाला विचारले. मात्र नारळ पाणी कडवटच असते असे मुलाने आई वडिलांना सांगितले. साधुराम कोटंबे यांनी नारळ पाणी संपवले. मात्र गयाबाई यांनी दोन घोट नारळपाणी पिऊन शहाळे तसेच ठेवून दिले. काही वेळाने साधुराम कोटंबे आणि गयाबाई या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. या दोघांनाही लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साधुराम कोटंबे यांचा रात्री मृत्यू झाला. ज्ञानदीपने आई वडिलांकडे प्लॉट, घर आणि मालमत्तेची वाटणी मागितली होती. मात्र त्यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. असे असूनही तो आई वडिलांकडे तगादा लावत होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सुरु आहे.