आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेची पहिली सभा भारतात होणार पंतप्रधानांच्या हस्ते या सभेसह इतर दोन कार्यक्रमांचे उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.२५ – आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेची पहिली सभा येत्या 2 ऑक्टोबरला भारतात होणार असून त्यासोबत इंडियन ओशन रिम असोसिएशनची दुसरी अक्षय ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक तसेच जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि प्रदर्शन 2018 हे सगळे कार्यक्रम 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस ॲन्टोनिओ गुटारेस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते एका संयुक्त कार्यक्रमात या तिन्ही महोत्सवांचे उद्‌घाटन होईल. त्याशिवाय सौर सहकार्याशी संबंधित व्यापार आणि तांत्रिक वस्तुंचे प्रदर्शनही या दरम्यान नोएडा येथे आयोजित केले जाईल. केंद्रीय नवीकरण आणि अक्षय ऊर्जा विभागाने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याचे उद्‌घाटन 2015 साली पॅरिस येथे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते झाले होते. सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या देशांमध्ये या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी अनेक देशांदरम्यान एक करारही करण्यात आला.

हवामान बदलाच्या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी पर्यायी ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेचा विकास आणि वापर करण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे. या सौर सहकार्य सभेत विविध देशातले 121 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या सभेत जागतिक सौर कार्यक्रम तयार केला जाईल तसेच काही करारांवरही स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या कार्यक्रमात नवीकरणीय आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे तसेच त्यासाठी गुंतवणूक आमंत्रित करणे यासाठी प्रयत्न केले जातील. या तीन दिवसीय परिषदेत विविध उद्योग क्षेत्र, स्वच्छ आणि नवीकरणीय उर्जेसंबंधी संशोधन आणि धोरणांची माहिती देतील. या परिषदेत 600 हून अधिक उद्योजक सहभागी होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.