अपंग युवकांसाठी जागतिक माहिती तंत्रज्ञान आव्हान 2018 ला प्रारंभ
जागतिक माहिती तंत्रज्ञान आव्हान 2018 या अपंग युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमाचे नवी दिल्लीत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे सबलीकरण विभाग आणि कोरिया पुनर्वसन आंतरराष्ट्रीय यांनी संयुक्तरित्या या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आशिया-पॅसिफिक विभागातल्या अपंगत्व असलेल्या युवांमध्ये माहिती तंत्रज्ञान कौशल्याचा प्रसार करणे आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे आयुष सुसह्य करण्यासाठी माहिती आणि संगणक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा:-भारतीय लष्कराच्या भेदक क्षमतेत वाढ
यावर्षी भारतासह 18 देशातल्या अपंगत्व असणाऱ्या 100 युवकांची या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जून 2018 मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आव्हान स्पर्धेद्वारे या युवकांची निवड करण्यात आली आहे.
अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींचे माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्यावर सर्व संबंधितांनी भर देण्याचे आवाहन कृष्ण पाल गुर्जर यांनी केले.
अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे केंद्रीय सचिव शकुंतला डी. गेमलीन म्हणाल्या.