असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न-संतोष गंगवार
कर्मचारी भविष्य निर्वाय निधीतील अर्थात ईपीएफओमधील दावे लवकरात लवकर निकाली निघावेत म्हणून सेवांचे डिजिटायझेशन करण्याच्या ईपीएफओच्या प्रयत्नांचे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यांनी कौतुक केले. ईपीएफओच्या 66 व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते नवी दिल्ली येथे बोलत होते.
असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, असे गंगावार यांनी सांगितले. ईपीएफओच्या 117 जिल्हा कार्यालयात ‘क्लेम रिसीट एंट्री’ या ऑनलाईन सुविधेचे उद्घाटन गंगावार यांनी केले. या सुविधेमुळे आपला दावा सादर करण्यासाठी सदस्यांना कराव्या लागणाऱ्या दूरच्या प्रवासाची बचत होईल तसेच दाव्यांबाबत ऑनलाईन माहितीही मिळू शकेल.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचेही चांगले परिणाम दिसून येत आहेत असे सांगून या नव्या योजनेचा सुमारे 85 लाख नव्या कर्मचाऱ्यांना फायदा झाल्याचे गंगवार म्हणाले. या योजनेसाठी सरकारचा सहभाग 2 हजार 405 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कामगार आणि रोजगार सचिव हिरालाल समारिया, केंद्रीय भविष्य निधी आयुक्त सुनील बरथवाल यांचीही यावेळी भाषणे झाली.