अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
परळी – नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून नेऊन एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथे उघडकीस आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी अल्पवयीन पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यावेळी तांड्यावरीलच सचिन सखाराम राठोड या तरुणाने तिला गाठले आणि तिला उचलून शेजारच्या हायब्रीडच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी देखील सचिनने पिडीतेला दिली. घरी आल्यानंतर पिडीतेने घडलेला प्रकार आई, वडील आणि भावाला सांगितला. त्यांनी पिडीतेला धीर देत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन सखाराम राठोड याच्यावर कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्यान्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने आरोपीला काल अटक केली असून पुढील तपास फौजदार भिकाने हे करत आहेत.